पंतप्रधान मोदी यांचे इस्रायलमध्ये आवाहन
पंतप्रधान दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर
भारतीय जनतेच्या वतीने मी 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या भयानक हमास दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करतो. आम्ही तुमचे दुःख समजतो. प्रत्येक कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. दहशतवादविरोधात जगाने एकजुटीची भूमिका घ्यावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमध्ये सांगितले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ वर्षांनंतर पुन्हा इस्रायलच्या दौऱ्यावर गेले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीने विमानतळावर पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना विशेष गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसदेला संबोधित केले.
यावेळी मोदी यांनी, भारतीय जनतेच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. संसदेला संबोधित करणारा हा माझ्यासाठी पहिला भारतीय पंतप्रधान असण्याचा अभिमानाचा क्षण आहे. मला पुन्हा येथे येऊन खूप आनंद झाला असल्याचे म्हटले.
भारत इस्रायलच्या पाठीशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना, नष्पाप नागरिकांची हत्या सहन केली जाणार नाही. भारत पूर्ण आत्मविश्वासाने इस्रायलसोबत खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मंजूर केलेला गाझा शांतता उपक्रम हा एक चांगला मार्ग आहे. भारताने यासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या प्रदेशातील सर्व लोकांसाठी, पॅलेस्टिनी समस्येच्या निराकरणासह, न्याय्य आणि चिरस्थायी शांततेचे प्रयत्न सुरू आहेत. शांतीचा मार्ग नेहमीच सोपा नसतो, परंतु या प्रदेशात संवाद, शांती आणि स्थिरतेसाठी भारत तुमच्या आणि जगासोबत उभा असल्याचे सांगितले.
इस्रायली संसदेत घोषणाबाजी
तत्पूर्वी, संसदेत मोदी, मोदी अशा घोषणा देण्यात आल्या. नेसेटचे सभापती अमीर ओहाना यांनी हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे असे म्हणत पंतप्रधानांचे नमस्ते म्हणत स्वागत केले. ओहाना यांनी बोलताना, भारत हा सर्वात वेगाने वाढणारा देश आहे. भारत आणि इस्रायल हे खरे मित्र आहेत. भारताने यहुद्यांना घर दिले. मुंबई दहशतवादी हल्ला असो किंवा पहलगाम, इस्रायल तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.