नक्षल प्रभावित क्षेत्रात नक्षलविरोधी मोहीम तीव्र;
आता केवळ चार प्रमुख नेते आणि 200 नक्षल्यांचे आव्हान?
नक्षलवादाचा प्रभाव ओसरला
एकेकाळी देशातील 150 हून अधिक जिल्ह्यांत पसरलेला नक्षलवाद आता केवळ 10 जिल्ह्यांत मर्यादित झाला आहे. त्यातही छत्तीसगडमधील बिजापूर, सुकमा आणि दंतेवाडा हे केवळ 3 जिल्हे अतिसंवेदनशील गटात आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज देशभरात केवळ 200 नक्षलवादी शिल्लक आहेत. महाराष्ट्रात (गडचिरोली) 9, तेलंगणात 4, झारखंडमध्ये 40 तर छत्तीसगडमध्ये जवळपास 150 सशस्त्र नक्षलवादी शिल्लक आहेत. अनेक जिल्हे नक्षलमुक्त झाले आहे. नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड आणि राष्ट्रीय उद्यान परिसरातील अनेक गावांमध्ये पोलीस मदत केंद्रांची स्थापना करून मोठ्या प्रमाणात असलेली सुरक्षा पोकळी भरून काढल्या जात आहे. त्यामुळे देशातील एका मोठ्या भूभागावर असलेला नक्षल्यांचा प्रभाव आणि दहशत पूर्णपणे कमी झाल्याचे चित्र आहे.
देशातून 31 मार्चपर्यंत नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केला होता. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आता 60 दिवसांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी देशभरातील नक्षल प्रभावित क्षेत्रात नक्षलविरोधी मोहीम तीव्र केली आहे. मागील दोन वर्षात देशभरात नक्षल चळवळीची मोठी पीछेहाट झालेली असली तरी अद्याप चार प्रमुख नेते आणि दोनशेचा जवळपास सदस्य शिल्लक असल्याने दिलेल्या वेळेत नक्षल्यांचा बिमोड करण्याचे सुरक्षा यंत्रणा समोर आव्हान आहे.
गेल्या दोन वर्षांत छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश ओडिशा, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यात सुरक्षा यंत्रणांनी राबविलेल्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानामुळे 500 हून अधिक नक्षलवादी ठार झाले, तर तीन हजाराहून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग निवडला. मागील वर्षी नक्षल संघटनेचा सर्वोच्च नेता व महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसवराजू, माडवी हिडमासह तब्बल दहा केंद्रीय समिती सदस्य ठार झाले. दुसरीकडे नक्षल्यांचा प्रमुख नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याच्यासह सहा केंद्रीय समिती सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याने चळवळीला आजपर्यंतचा सर्वोच्च धक्का बसला आहे.
वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजघडीला नक्षल संघटनेत केवळ तीन पॉलिट ब्युरो आणि एक केंद्रीय समिती असे केवळ चार प्रमुख नेते शिल्लक आहेत. त्यात मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती (75), थिप्पीरी तिरुपती उर्फ देवजी (62), मिशीर बेसरा उर्फ सागर (63) आणि मल्ला राजी रेड्डी उर्फ संग्राम (73) यांचा समावेश आहे. यातील गणपतीबद्दल मागील वर्षभरापासून सुरक्षा यंत्रणांना देखील माहिती नाही, तर देवजी हा आंध्रप्रदेश पोलिसांच्या ताब्यात असल्याचा दावा केला जात आहे.
मिशीर बेसरा हा झारखंड, तर संग्राम ओडिशा राज्याच्या सीमाभागात सक्रिय असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात सुरक्षा यंत्रणांनी नक्षलविरोधी मोहीम अधिक गतिमान केली आहे. आठवडाभरापूर्वी या भागात झालेल्या चकमकीत केंद्रीय समिती सदस्य पतीराम मांझी ठार झाला होता. त्यामुळे उर्वरित नेते आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे.
अमित शहांनी घेतली आढावा बैठक
अमित शहा यांनी गत आठवड्यात छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे नक्षलवादाच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत सहभाग घेतला. नवा रायपूर अटल नगर येथे एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीला छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक आणि विशेष गृह सचिव यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा या संस्थांचे महासंचालक, तसेच छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, झारखंड आणि तेलंगणा या राज्यांचे पोलीस महासंचालक या बैठकीला उपस्थित होते.