- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर (निवृत्त प्राचार्य)
वाचनाच्या असंख्य फायद्यांमुळे एकूण समाजाचं स्वास्थ्य सुधारतं म्हणून सामाजिक विकासाच्या इतर बाबींप्रमाणेच वाचन-संस्कृतीचा विकास तेवढाच महत्त्वाचा आहे. मात्र त्यासाठी प्रत्यक्ष कृतिशील प्रयत्न आवश्यक आहेत आणि या कामी शाळा आणि शिक्षकांची भूमिका निर्विवादपणे महत्त्वाची आहे!
‘वाचन-संस्कृती कशी वाढीस लागेल?’ या विषयावरील चर्चा गेली बरीच वर्षे चालू आहे. मोठं राष्ट्रीय किंवा राज्यपातळीवरील साहित्यसंमेलन असो किंवा छोटेखानी तालुका किंवा ग्रामीण पातळीवरील साहित्यमेळावा असो, त्यात बहुतेक वेळा वाचन-संस्कृती हा परिसंवादाचा विषय असतोच. शीर्षकं बदलतात, परंतु आशय मात्र तोच! वक्त्यांना दिलेल्या वेळेपैकी नव्वद टक्के वेळ ‘शिक्षक वाचत नाहीत’, ‘मुलं वाचत नाहीत’, ‘पालक वाचत नाहीत’ हे तीन बाण मारण्यातच संपतो. म्हणजे काय तर समस्यांचं केवळ निरुपण! उरलेला दहा टक्के वेळ ‘शिक्षकांनी आणि पालकांनी वाचलं पाहिजे, म्हणजे मुलं वाचतील’ हा रोजचाच सल्ला देण्यात जातो. समस्यांचं असं निरूपण करून आणि व्यासपीठावरून असे सल्ले देऊन वाचन-संस्कृती वाढीस लागली असती तर इतक्यात सगळीकडे लोक हातात पुस्तकं घेऊनच दिसले असते आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्सऐवजी पावलापावलांवर पुस्तकांचीच दुकानं दिसली असती! समस्यांच्या निरूपणापेक्षा निराकरणाचे उपाय महत्त्वाचे असतात आणि ते प्रत्यक्ष राबवल्याशिवाय समस्या सुटत नसतात. म्हणून तर ‘वाचन-संस्कृती वाढीस लावली पाहिजे’ हा विषय पालक आणि शिक्षकांना दोषी ठरवत गेली अनेक वर्षे चर्चेत राहिला आहे. अलीकडे आणखीन एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे मोबाइल!
शाळांची व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
वाचन-संस्कृती वाढीस लावण्याचं काम प्रामुख्याने शाळाच आणि शिक्षकच करू शकतात, हे शिक्षकांना कटू वाटलं तरी त्रिवार सत्य आहे! या विषयात घराची आणि पालकांची भूमिका साहाय्यकाची आहे. म्हणजे वाचन-संस्कृतीचं रोप शाळेत लावलं पाहिजे, शिक्षकांनी त्या रोपट्याला पाणी घातलं पाहिजे आणि घरी पालकांनी त्या रोपट्याचं रक्षण केलं पाहिजे! याचा अर्थ शिक्षकांनी मुलांना शाळेत वाचनाची गोडी लावली पाहिजे आणि घरी पालकांनी त्या गोडीला पुष्टी दिली पाहिजे. ज्यांच्या घरात पुस्तकं असतात, ती सगळी मुलं वाचक बनतात असं नाही, आणि ज्यांच्या घरात एकही पुस्तक नसतं त्या घरातली मुलं चांगली वाचक बनत नाहीत असंही नाही. हे सत्य असतं तर सगळे पुस्तकविक्रेते चोखंदळ वाचक बनले असते! अर्थात, पुस्तकं समोर दिसली की वाचावीत असं वाटतं हे काही अंशी खरं आहे; परंतु पूर्णत: नव्हे!
पुस्तककेंद्री उपक्रम
मुख्य मुद्दा हा की वाचनाची आवड शाळेत प्रयत्नपूर्वक निर्माण केली पाहिजे आणि ती ‘काहीतरी वाचा रे’ असा कंठशोष करून निर्माण होत नाही. त्यासाठी शाळेने प्रत्यक्ष कृतिशील व्हावं लागतं.
यासंदर्भात काय-काय करता येईल ते बघू-
- शिक्षकांनी स्वतः नियमितपणे वाचलं पाहिजे आणि शिक्षक नियमित वाचतात हे मुलांना कळलं पाहिजे.
आमचे शिक्षक पुस्तकं वाचतात हे मुलांना कसं कळेल? वाचणाऱ्या शिक्षकाला मुलं लगेच ओळखतात. तो शिकवताना जेव्हा वेगवेगळे संदर्भ देतो, तेव्हा मुलांना न सांगताच समजतं की आपले हे शिक्षक पुस्तकं वाचतात! शिवाय वाचणारा शिक्षक आपण वाचलेल्या पुस्तकाविषयी, ज्या लेखकाचं पुस्तक वाचलं त्या लेखकाविषयी साहजिकच वर्गात सांगतो. त्यामुळे पुस्तकांमध्ये अशी नवनवीन माहिती उपलब्ध असते हे मुलांना समजतं आणि मुलांमध्ये हळूहळू वाचनाची आवड निर्माण होते. - छोट्या मुलांना पुस्तकातील गोष्टी वाचून दाखवणे.
- पुस्तक वाचून त्यामधील म्हणी, वाक्प्रचार, सुविचार स्वतंत्र वहीत नोंद करायला लावणे.
- पुस्तकांच्या आधारे निबंध लिहायचा आणि भाषण करायचा प्रयोग भाषाशिक्षकांनी केला पाहिजे. त्यामुळे पुस्तकं वाचल्याने चांगले निबंध लिहिता येतात, चांगलं भाषण करता येतं हे मुलांच्या ध्यानात येईल आणि ती पुस्तकांशी जोडली जातील.
- वर्गातील जे विद्यार्थी पुस्तकं वाचतात त्यांना वाचलेल्या पुस्तकांविषयी वर्गासमोर बोलायला लावायचं. त्यामुळे जे वाचत नाहीत त्यांना हळूहळू पुस्तके वाचायची इच्छा होईल.
- चार-पाच मुलांचा गट तयार करून एखाद्या गोष्टीवरून छोटी नाटिका तयार करून ती वर्गासमोर सादर करायला लावायची. नाटिकेतील रंजकतेमुळे मुलं पुस्तकांकडे आकर्षित होतील.
- शाळेच्या ग्रंथालयातील एखाद्या पुस्तकाचा शिक्षकाने वर्गात अशा पद्धतीने परिचय करून द्यावा की वर्गातील किमान काही मुलांना ते पुस्तक वाचायची इच्छा होईल.
- छोट्या पुस्तकांवर प्रश्नावली तयार करून त्या प्रश्नांची उत्तरं लिहायला लावली तर प्रश्नोत्तरं शोधण्याच्या निमित्ताने पुस्तकाचं वाचन होईल.
- काही पुस्तकांवर भित्तिपत्रक तयार करण्याचा उपक्रमही घेता येतो.
- नियमित पुस्तकं वाचणाऱ्या एखाद्या मुलाची इतर मुलांनी प्रश्न विचारून मुलाखत घ्यावी.
- गोकुळकाल्याला दहीहंडीच्या धर्तीवर पुस्तक हंडी आयोजित करणे.
- वर्षातून एकदा वाचन-सप्ताह साजरा करून त्यात पुस्तककेंद्री उपक्रम घ्यावेत.
- शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचं वर्षातून एकदा तरी प्रदर्शन भरवणे. त्यामुळे आपल्या शाळेच्या ग्रंथालयात कोणकोणती पुस्तकं उपलब्ध आहेत हे मुलांना समजतं.
- ग्रंथालयातील पुस्तकांना मुखपृष्ठ दिसेल अशी पारदर्शक आच्छादने घालावीत. कारण पुस्तकाचं मुखपृष्ठ बघून अनेकांना पुस्तक वाचायची इच्छा निर्माण होते.
- वर्षभर सातत्यपूर्ण वाचणाऱ्या मुलांचा वर्षअखेर वाचनवीर, वाचनभूषण, वाचनश्री अशा नावाने पुरस्कार देऊन सन्मान करणे.
- वाचन कसं करावं हेच बहुतेक मुलांना माहीत नसतं. त्यासाठी ‘उत्कृष्ट वाचन कसे करावे?’ या विषयावर मुलं इयत्ता पाचवीच्या वर्गात असल्यापासूनच मार्गदर्शन करावे. मी स्वतः या विषयावरील कार्यशाळा अनेक ठिकाणी घेतल्या आहेत. सध्या ही कार्यशाळा मोरजी (पेडणे) येथील निवृत्त शिक्षक श्री. सुभाष काशिनाथ शेटगावकर हे घेतात. या कार्यशाळेत मुलांना वाचन करतानाचे दोष कोणते? वाचनाचा वेग कसा वाढवावा? अक्षरं पटकन कशी ओळखावीत? वाचताना डोळ्यांची हालचाल कशी करावी? इत्यादी तांत्रिक गोष्टी प्रात्यक्षिकांच्या आधारे या कार्यशाळेत शिकवल्या जातात.
प्रा. दिलीप बेतकेकर हेसुद्धा प्रात्यक्षिकांसह ‘वाचू आनंदे’ ही कार्यशाळा घेतात.
अशा वाचन विषयावरील कार्यशाळांमधून मुलांना वाचनामधील आनंदाचा साक्षात्कार होतो. जी गोष्ट केल्याने आनंद मिळतो, ती गोष्ट मुले आवडीने करतात. वाचनातून आनंद मिळतो हे लक्षात आल्यावर मुलं खेळाप्रमाणेच पुस्तकांमध्ये रमतील.
उपदेश नको, प्रत्यक्ष कामास प्रारंभ
‘पुस्तके वाचा’ असं परत परत ओरडून मुलं जशी पुस्तकं वाचत नाहीत, त्याचप्रमाणे ‘तुम्ही शिक्षकांनी वाचलं पाहिजे!’ असा उपदेश वारंवार करूनही शिक्षक पुस्तकं वाचत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जोवर शिक्षक स्वतः पुस्तकं वाचत नाहीत, तोवर त्यांना ‘पुस्तकं वाचा’ असं विद्यार्थ्यांना सांगण्याचा नैतिक अधिकार नाही. शिवाय ‘शिक्षकच वाचत नाहीत, तर मुलं कशी वाचतील?’ हा वकिली प्रश्नरूपी बाण पालक सातत्याने शिक्षकांवर मारतच असतात. त्यामुळे या प्रश्नांच्या खोल दरीत वाकून वेळ वाया न घालता गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती, गोवा’ संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात मी प्राचार्य असताना वाचन-संस्कृतीच्या विकासासाठी राबविलेले दोन उपक्रम सांगतो.
वाचन-साधना
पहिला उपक्रम म्हणजे ‘होराभूषण वसुधा रघुनाथ वाटवे स्मृती वाचन साधना’ हा शिक्षक/शिक्षिका तथा ग्रंथपाल यांनी नियमित वाचन करण्याचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शिक्षक/शिक्षिका व ग्रंथपाल दर महिन्याला एक पुस्तक वाचून पंचवीस प्रश्नांच्या आधारे पुस्तकाची तांत्रिक माहिती लिहितात आणि त्या पुस्तकावर 500 ते 750 शब्दांत सविस्तर परीक्षण लिहितात. या उपक्रमास भाषेचं बंधन नसल्याने मराठी, हिंदी, कोंकणी व इंग्रजी भाषेतील पुस्तकं वाचली जातात. पुस्तक परीक्षण लिहिण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र वही दिली जाते. परीक्षण सादर करण्याची महिन्याची एक विशिष्ट तारीख ठरलेली असते. त्या तारखेस सादर केलेली परीक्षणेच एखाद्या अनुभवी साहित्यिकाकडे किंवा भाषेच्या प्राध्यापकाकडे/शिक्षकाकडे महिन्याचं उत्कृष्ट परीक्षण ठरवण्यासाठी गुण विभागणी तक्त्यासह दिली जातात.
मी प्राचार्य असताना 2021-22 या शैक्षणिक वर्षात हा उपक्रम सुरू केलेला, जो मी निवृत्त झाल्यावरही अजून चालू आहे.
या नावीन्यपूर्ण उपक्रमाचं स्वरूप असं आहे-
पहिल्या पर्वात म्हणजे 2021-22 या शैक्षणिक वर्षात ‘बुक ऑफ माय चॉईस’ या संकल्पनेखाली प्रत्येकाने आपल्या आवडीची पुस्तके वाचलेली. या उपक्रमात तोचतोचपणा येऊ नये म्हणून नंतर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या संकल्पनेखाली पुस्तके वाचण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुसऱ्या पर्वात म्हणजे 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रत्येकाने ‘स्टडी ऑफ ॲन ऑथर’ या संकल्पनेखाली आपल्या आवडीच्या लेखकाची पुस्तकेच वर्षभर वाचली होती. या पर्वात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, रणजित देसाई, रवींद्र पिंगे, व. पु. काळे, सुधा मूर्ती, दामोदर मावजो, पुंडलिक नायक, महाबळेश्वर सैल, रॉबिन शर्मा, किरण बेदी, चेतन भगत या विविध भाषांमधील लेखकांची पुस्तके वाचली गेली.
तिसऱ्या पर्वात ‘स्टडी ऑफ डिफरन्ट फॉर्र्मस् ऑफ लिटरेचर’ या संकल्पनेखाली कादंबरी, कथा, नाटक, चरित्र/आत्मचरित्र, काव्य, धार्मिक, प्रेरक, शैक्षणिक या विविध साहित्यप्रकारांतील पुस्तकांचं वाचन केलं गेलं.
चौथ्या पर्वात ‘स्टडी ऑफ लिटरेचर फ्रॉम डिफरन्ट इंडियन लँग्वेजीस’ या संकल्पनेखाली हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड, मल्याळम, संस्कृत, आसामी, तेलगू, उडिया इत्यादी भारतीय भाषांमधील मराठी, कोंकणी, इंग्रजी या भाषांत अनुवाद केलेली पुस्तके वाचली गेली.
पाचव्या पर्वात यंदा ‘स्टडी ऑफ गोवन लिटरेचर’ या संकल्पनेखाली गोमंतकीय साहित्यिकांची कादंबरी, कथा, ललित, काव्य, नाटक, इतिहास, लोककला व लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती, पर्यावरण आणि वैचारिक या साहित्यप्रकारांतील पुस्तके वाचली जात आहेत.
दर महिन्याला उत्कृष्ट परीक्षण लिहिणाऱ्यास आणि वर्षभर ज्यांच्या परीक्षणाला सर्वाधिक गुण प्राप्त झाले, त्यांना शैक्षणिक वर्षाच्या शेवटी एका स्वतंत्र कार्यक्रमात पुस्तकरूपात बक्षिसे दिली जातात. या उपक्रमाचा सर्व आर्थिक भार दरवर्षी श्री. अतुल रघुनाथ वाटवे हे उचलतात.
जून ते मार्च असे दहा महिने हा उपक्रम चालतो. त्यामुळे या उपक्रमाद्वारे दरवर्षी प्रत्येक शिक्षक/शिक्षिका व ग्रंथपाल दहा पुस्तकांचं वाचन करून त्यांवर परीक्षणे लिहितात. म्हणजे येत्या मार्चपर्यंत गणेशपुरी, म्हापसा येथील श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक/शिक्षिकांची पन्नास पुस्तके वाचून त्यांवर परीक्षणे लिहिलेली असतील!
प्राचार्य हा आधी आचार्य असतो म्हणून या उपक्रमात मीसुद्धा सहभागी झालो होतो. इतरांबरोबर मीदेखील निश्चित केलेल्या तारखेस परीक्षण सादर करीत होतो. त्यामुळे उपक्रम केवळ शिक्षकांचा न होता, संपूर्ण शाळेचा झाला होता. फक्त परीक्षणांच्या स्पर्धेत मी सहभागी होत नव्हतो.
2021-22 या शैक्षणिक वर्षात हाच उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू केला. तोदेखील अजून चालू आहे. दर महिन्याला प्रत्येक वर्गातून तीन उत्कृष्ट परीक्षणे निवडून त्यांना बक्षिसे दिली जातात. शिवाय वर्षाच्या शेवटी वर्षभरात उत्कृष्ट परीक्षणे लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात. विद्यार्थ्यांची ही परीक्षणे शिक्षकच तपासतात. आपले सर्व शिक्षक वाचतात हे लक्षात आल्याने विद्यार्थीही दर महिन्याला एक पुस्तक आवडीने वाचतात आणि परीक्षण लिहितात. फक्त मुलांची परीक्षणे आकाराने छोटी असतात. या उपक्रमामुळे मुलांचं ग्रंथालयात जाणं वाढलं. त्यामुळे ग्रंथालयात पुस्तकं शोधायची सवयही लागली.
सर्व शिक्षक आणि विद्यार्थी नियमितपणे दर महिन्याला एक पुस्तक वाचून त्यावर परीक्षण लिहितात असं गणेशपुरी, म्हापसा येथील श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय हे गोव्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव विद्यालय आहे.
लहान वयात लागलेल्या बऱ्या-वाईट सगळ्याच सवयी आयुष्यभर साथ करतात. म्हणून चांगल्या सवयी या व्यसनासारख्या जडल्या पाहिजेत. वाचनाचं असंच व्यसन विद्यार्थीदशेत जडायला हवं.
पुस्तक भिशी
दर महिन्याला प्रत्येक शिक्षक/शिक्षिका व शिक्षकेतर बंधुभगिनी 200 रुपये काढून भिशी चालवतात. भाग्यवान सदस्य त्या रकमेची आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करतो. शिक्षकांच्या व शिक्षकेतर बंधुभगिनींच्या घरी स्वतःचं छोटेखानी ग्रंथालय असावं या हेतूने हा उपक्रम सुरू केला होता, जो आजही चालू आहे. प्रत्येकाने आपला पुस्तक संच वाचून झाल्यावर आपल्या सहकाऱ्यांना वाचायला दिला तर प्रत्येकास हजारो रुपयांची शेकडो पुस्तके वाचायला मिळतील. शाळेचं एक प्रकारचं फिरतं ग्रंथालय या पुस्तक भिशीच्या रूपात तयार झालं आहे.
विद्यालयाने या उपक्रमांचा व्यवस्थित दस्तावेज ठेवला आहे. विद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन सर्व परीक्षण, वह्या आणि दस्तावेज बघितल्यास या उपक्रमांचं महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल.
अन्य ठिकाणचे वाचनविषयक उपक्रम
महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी हे ज्या विद्यालयात मुख्याध्यापक होते, त्या विद्यालयातील प्रत्येक शिक्षक रोज काहीतरी वाचत. दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरीपटावर सही करण्यासाठी आल्यावर आपण काल काय वाचलं हे मुख्याध्यापकांना सांगायचं, असा उपक्रम होता.
प्रियोळ येथील स्वस्तिक विद्यालयात प्रत्येक वर्गाला आठवड्याला एक वाचनाचा तास ठेवला आहे. मुलं तीन आठवड्यातील तीन तासांत पुस्तक वाचतात आणि चौथ्या आठवड्यात वाचलेल्या पुस्तकाचं विवेचन करतात आणि वाचलेल्या पुस्तकाबद्दल एका स्वतंत्र वहीत लिहितात.
मध्यंतरी एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षेत ग्रंथालय तयार केल्याची बातमी वाचली होती.
शिरोडा (सिंधुदुर्ग) येथील श्री. दीपक कब्रे हे व्यवसायाने स्कूटर व रिक्षा मेकॅनिक आहेत. अर्थातच शिक्षण बेताचंच झालं आहे. परंतु ज्यावेळी त्यांच्या हातात स्कूटर किंवा रिक्षा नसते, त्यावेळी त्यांच्या हातात पुस्तक असते, हे मी गेली अनेक वर्षे बघत आलो आहे.
सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी वाचन
तात्पर्य, उच्चशिक्षित लोकच वाचनप्रेमी किंवा वाचक असतात आणि सुशिक्षितांनी व विद्यार्थ्यांनीच वाचलं पाहिजे असा समज करून घेणे गैर होईल. वाचनामुळे माणसाला ज्ञान आणि अनुभवाची प्राप्ती तर होतेच, परंतु तो प्रगल्भही होतो. त्याच्या कल्पनाशक्तीचा, सर्जनशीलतेचा विकास होतो. त्याची निर्णयक्षमता विकसित होते. चांगल्या पुस्तकांच्या वाचनामुळे त्याचे विचार अधिक समृद्ध होतात. आपल्या दुःखांपेक्षाही अधिक तीव्र दुःख भोगणारे या जगात आहेत हे त्याला समजतं आणि त्यामुळे तो आपली दुःखे कुरवाळत बसणं, सजवणं आणि सुजवणं सोडून देतो. जॉर्ज मार्टिन्स याने जे म्हटलंय की यअ ीशरवशी श्रर्ळींशी र ींर्हेीीरपव श्रर्ळींशी लशषेीश हश वळशी. ढहश ारप ुहे पर्शींशी ीशरवी, श्रर्ळींशी ेपश्रू ेपश!’ हे खरोखरच सार्थ आहे.
वाचनाच्या असंख्य फायद्यांमुळे एकूण समाजाचं स्वास्थ्य सुधारतं म्हणून सामाजिक विकासाच्या इतर बाबींप्रमाणेच वाचन-संस्कृतीचा विकास तेवढाच महत्त्वाचा आहे. मात्र त्यासाठी प्रत्यक्ष कृतिशील प्रयत्न आवश्यक आहेत आणि या कामी शाळा आणि शिक्षकांची भूमिका निर्विवादपणे महत्त्वाची आहे!