2016 मधील कथित बलात्कार प्रकरण; विशेष न्यायालयाचा निकाल; सबळ पुराव्यांचा अभाव; पीडित मुलीने सहा वेळा बदलल्या जबान्या
राज्यात 2016 मध्ये गाजलेल्या एका मुलीवरील कथित बलात्काराच्या आरोपातून महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि सहआरोपी रोझारिया ऊर्फ रोझी फेरीस यांना मेरशी येथील विशेष न्यायालयाने काल सबळ पुराव्यांच्या अभावी निर्दोष ठरवले. पीडित मुलीने सहा वेळा वेगवेगळ्या दिलेल्या जबान्या, वैद्यकीय अहवाल आणि पीडितेनेच खोटी तक्रार नोंदवल्याची दिलेली कबुली यामुळे मोन्सेरात निर्दोष ठरले. कथित बलात्कार प्रकरणात निर्दोष ठरवल्याने मंत्री मोन्सेरात यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कथित बलात्कार प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यात पूर्ण झाली होती. विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा निवाडा काल जाहीर केला. 2016 मध्ये एका 16 वर्षीय मुलीने आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मोन्सेरात हे त्यावेळी सांताक्रूझचे आमदार होते. आपल्या आईने सुमारे 50 लाख रुपयांना एका मध्यस्थाच्या माध्यमातून आपल्याला बाबूश मोन्सेरात यांना विकल्याचा आरोप सदर मुलीने केल्याने खळबळ उडाली होती. मोन्सेरात यांनी त्यांच्या निवासस्थानी आपल्याला मादक पदार्थ पाजून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोपही सदर मुलीने केला होता.
या प्रकरणामध्ये बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात भा.दं.सं.ची विविध कलमे आणि गोवा बाल कायद्याखाली बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तसेच, सहआरोपी रोझी फेरीस हिलाही अटक केली होती. न्यायालयात या बलात्कार प्रकरणी 250 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणात 40 जणांच्या साक्षी नोंदविल्या होत्या.
या बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी त्या पीडित मुलीच्या वयाबाबत शंका निर्माण झाली होती. त्यामुळे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात त्या मुलीचे वय सोळा वर्षांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपपत्रातून गोवा बाल कायद्याखालील कलमे मागे घेण्यात आली होती. तथापि, पोक्सो कायद्याखालील कलम मागे घेण्यात आले नव्हते.
पीडितेने 6 वेळा जबानी बदलली
या कथित बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीवेळी पीडित मुलीने सहा वेळा वेगवेगळ्या जबान्या दिल्या. एकाच न्यायाधीशांसमोर काही विधाने परस्पर विरोधी केली. त्यामुळे या घटनेच्या सत्यतेबाबत शंका निर्माण झाली होती. सदर प्रकरण हे पीडित मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवालावर अवलंबून होते. सदर पीडितेने वेळोवेळी विसंगत जबानी दिली आणि अखेर आपली तक्रार खोटी असल्याचे मान्य केले. आपल्याला ‘अपना घर’मध्ये राहायचे नव्हते. त्यामुळे एक क्राईम शो पाहिल्यानंतर ही कथा रचल्याचे पीडितेने मान्य केले, अशी माहिती मोन्सेरात यांचे वकील ॲड. दामोदर धोंड यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
न्याय मिळाला : बाबूश मोन्सेरात
एका मुलीने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे गेली 10 वर्षे आपणाला आणि कुटुंबीयांना भरपूर मनस्ताप सहन करावा लागला. आपला न्यायालयावर पूर्ण विश्वास होता. अखेर, न्यायालयाने आपणाला न्याय दिला, अशी प्रतिक्रिया मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी न्यायालयीन निवाडा जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केली.
गुदिन्होंनंतर मोन्सेरात यांनाही दिलासा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील दोन सदस्य माविन गुदिन्हो यांच्यावर भ्रष्टाचार आणि बाबूश मोन्सेरात यांच्यावर बलात्काराला आरोप होता. मंत्री माविन गुदिन्हो यांची वीज खात्यातील भ्रष्टाचार प्रकरणात पुराव्याच्या अभावामुळे सत्तावीस वर्षांनंतर ऑगस्ट 2025 मध्ये निर्दोष ठरवले होते. आता, बाबूश मोन्सेरात यांची बलात्काराच्या आरोपातून सबळ पुराव्यांअभावी दहा वर्षांनी निर्दोष ठरले आहेत.