Home Featured अपघात की घात?

अपघात की घात?

0

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात अलीकडेच झालेला मृत्यू हा अपघात की घात, असा सवाल त्यांचे पुतण्ये व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आणि अनेक मुद्दे सविस्तर मांडत नुकताच केला आहे. खरे तर ह्या दुर्घटनेनंतर त्यात घातपाताची शक्यता नसल्याचे सांगत स्वतः शरद पवार यांनी त्याबाबतच्या शंकांना पूर्णविराम दिला होता. परंतु त्यानंतर विमान दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आणि सगळीच समीकरणे पालटली. ही विमान दुर्घटना घडण्यामागे कमी दृश्यमानता हे कारण सुरुवातीला दिले गेले होते. दाट धुक्यात विमान उतरवले गेल्याने ते धावपट्टीबाहेर गेले व दुर्घटना घडली असेच सुरवातीला संबंधितांकडून सांगितले जात होते. परंतु विमानतळाच्या परिसरातील एका ग्रामपंचायतीबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्या विमानाचे दुर्घटनाग्रस्त होतानाचे चित्रण झाले आणि प्रत्यक्षात काय घडले हे जगासमोर आले. विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच अचानक ते एका बाजूला कलल्याचे त्यात स्पष्ट दिसते. म्हणजेच विमानात उतरण्यापूर्वीच काही दोष निर्माण झाला होता वा ते बंद पडले होते आणि तेच ह्या दुर्घटनेचे खरे कारण आहे, त्यात दृश्यमानतेचा काही संबंध नाही हे ह्या व्हिडिओमुळे सिद्ध होऊ शकले. आता त्यामुळे नवे प्रश्न उपस्थित झाले ते म्हणजे विमानातील हा बिघाड नेमका काय होता, तो का निर्माण झाला आणि त्यामागे काही घातपात असू शकतो का? रोहित पवार हे स्वतः अजित पवार यांचे पुतण्ये आहेत, त्यामुळे आपल्या काकांच्या अपघाती मृत्यूसंबंधी त्यांच्या मनात शंकांचे काहूर उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्यांनी घातपाताची शक्यता व्यक्त करताना संशयाची सुई एका दिशेने अप्रत्यक्षपणे वळवलेली आहे. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा चालली होती आणि स्वतः अजित पवार यांचा त्यात पुढाकार होता. मात्र, त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे ह्या चर्चेला तूर्त खीळ बसली. त्यामुळे ह्या राजकीय पार्श्वभूमीचा ह्या दुर्घटनेशी काही संबंध असू शकतो, असे त्यांच्या पत्रकार परिषदेतून अप्रत्यक्षपणे सूचित होते. आता ही अगदी टोकाची शक्यता झाली. तीही निश्चितच विचारात घेतली गेली जाऊ शकते, परंतु प्रथम हे विमान उतरण्यापूर्वी एका बाजूला जे कलले, त्याचे नेमके कारण काय, ते कशामुळे घडले हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. ह्या दुर्घटनाग्रस्त विमानासंदर्भात अनेक सवाल केले गेले आहेत. वैमानिक आयत्यावेळी बदलले गेले, वैमानिकावर पूर्वी मद्यपान केल्याबद्दल कारवाई झालेली होती इथपासून ते विमान आणि विमानोड्डाणासंदर्भात अनेक तांत्रिक प्रश्नही उपस्थित करण्यात आलेले आहेत. ह्यातील काही प्रश्न खरोखरच शंका उत्पन्न करणाऱ्या आहेत. डीजीसीएने जाहीर केलेली अपघातासंबंधीची माहिती व प्रत्यक्ष बारामती एटीसी यांनी दिलेली माहिती यांच्यातील तफावतही गंभीर स्वरूपाची आहे. विमानाचा ब्लॅकबॉक्स आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून मिळणाऱ्या माहितीचे निष्पक्ष विश्लेषण झाल्यानंतरच ह्यामागील कारणे स्पष्ट होऊ शकतील. गुन्हा अन्वेषण विभाग चौकशी करीत आहे, परंतु सीआयडी ही काही अशा प्रकारच्या तपासासाठी योग्य यंत्रणा नव्हे. त्यासाठी विमानांसंदर्भातील तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. डीजीसीएच्या कार्यपद्धतीवरच काही प्रश्न उपस्थित केले गेले असल्याने आणि मुख्य म्हणजे सदर खासगी विमान कंपनीमध्ये डीजीसीएचे माजी अधिकारी सेवेत असल्याने होणारी चौकशी निष्पक्ष होणार नाही अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे आणि बाह्य यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी पुढे केली आहे. ह्या विमान दुर्घटनेकडे केवळ अजित पवार यांच्या संदर्भात पाहिले जाता कामा नये. आपल्या अनेक महनीय, अतिमहनीय व्यक्ती, उद्योगपती, नेते, वरिष्ठ अधिकारी अशा छोट्या विमानांतून सतत प्रवास करीत असतात. वेळेची बचत करण्यासाठी त्यांच्यासाठी ते गरजेचे असते. त्यामुळे अशा छोट्या विमानांतील प्रवास कितपत सुरक्षित आहे असा जो प्रश्न ह्या दुर्घटनेतून निर्माण झालेला आहे, जी भीती निर्माण झालेली आहे, ती दूर करण्यासाठी ह्या दुर्घटनेमागील कारणे, तांत्रिक दोष, बिघाड वगैरे जे काही असेल ते सर्वांसमोर यायला हवे. अशा छोट्या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसंबंधीची मार्गदर्शक तत्त्वेही अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. ज्या गोष्टी मोठ्या विमानोड्डाण कंपन्यांना बंधनकारक असतात, तशाच त्या हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानसेवेलाही लागू पाहिजेत, तर अशा विमानोड्डाणांच्या वेळी योग्य ती काळजी घेतली जाईल व त्यातून प्रवास करणाऱ्यांचे जीवन असुरक्षित होणार नाही.