मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; उच्चस्तरीय बैठकीत आरोग्य सेवेचा आढावा; इस्पितळांत मनुष्यबळ वाढवणार
राज्य सरकार प्रत्येक नागरिकासाठी सुलभ, कार्यक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये पायाभूत सुविधा सुधारणे, प्रमुख रिक्त पदे भरणे आणि आपत्कालीन आणि विशेष सेवा सुधारणे यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्य विषयावर घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, उपजिल्हा इस्पितळ, काणकोण, केपे येथील प्राथमिक केंद्रातील आरोग्य सेवेचा आढावा घेऊन दर्जा वाढविण्यावर चर्चा करण्यात आली. या इस्पितळातील मनुष्यबळाची कमतरता लवकरच भरून काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यातील आरोग्य क्षमता वाढविण्यासाठी सेवा सुरू करणे, आपत्कालीन आणि ट्रॉमा सेंटर्सचे अपग्रेडेशन, अतिरिक्त परिचारिका, एमटीएस आणि तंत्रज्ञांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, सांगे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरच उद्घाटन, आरोग्यसेवेत नवीन रुग्णवाहिकांचा समावेश, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कार्यालयीन वाहने आणि आवश्यक उपकरणांची तरतूद, सांगे येथील नवीन सुविधेत डायलिसिस युनिट स्थापन करणे आदी विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.