दिल्लीतील पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवारांकडून संशय व्यक्त
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू अपघाताने झाला नसून, तो घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी बुधवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सविस्तर प्रेझेंटेशन देताना काही शंका उपस्थित केल्या.
अजित पवार यांच्या विमान अपघातासंबंधी विविध माध्यमातून माहिती मिळवल्याचे सांगत, रोहित पवारांनी प्रामुख्याने व्हीएसआर ही विमान कंपनी, ॲरो ही हँडलर कंपनी आणि विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमीत कपूर या तिघांवर संशय व्यक्त केला.
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तपास यंत्रणा अतिशय संथपणे काम करत असल्यामुळेच या प्रकरणी आपल्याला माहिती काढावी लागली, असे रोहित पवार यावेळी म्हणाले. तसेच, सगळ्या यंत्रणांद्वारे शोध घेतला, तर सत्य लवकर बाहेर येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि सरकारवर आपला कोणताही आरोप नसल्याचेही रोहित पवारांनी या सादरीकरणादरम्यान सांगितले.
अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये मुख्य वैमानिक सुमित कपूर यांची भूमिका संशयास्पद असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. या विमान अपघाताच्या काही क्षण आधी सहवैमानिक असलेल्या कॅप्टन शांभवी पाठक यांच्या संवादाची एक क्लिप समोर आली होती. यामध्ये त्या , ‘ओह शीट… ओह शीट’ बोलताना ऐकू येत आहे. त्यांना आता आपले विमान कोसळणार याचा अंदाज आल्यामुळेच त्या तसे बोलल्या असाव्यात, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले.
अजित पवार यांचे विमान ज्या गावात कोसळले तिथून नेहमी विमानं जातात. लोकांना विमानांचा आवाज परिचित आहे. गावातील लोकांचं म्हणणं आहे, अजित पवार यांच्या विमानातून वेगळा आवाज येत होता. त्यांचे विमानही खूप खाली होते. या सगळ्या परिस्थितीचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असावा. कदाचित कोणीतरी विमानातील सर्किट ब्रेकरच्या माध्यमातून विमान खाली आणले असावे. विमान खूप खाली आल्यानंतर स्टॉल वॉर्निंग सिस्टीम सुरु होते. पण स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद असावी. मात्र, विमान खूप खाली आल्यानंतर आता ते कोसळणार, याचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असेल. जो माणूस जीवाची पर्वा करतो, तशीच प्रतिक्रिया कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडून आली. त्यामुळे त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये ‘ओह शीट… ओह शीट’ बोलताना ऐकू येत आहे. यानंतर 9 ते 10 सेकंदात विमान खाली कोसळले. आमचा कॅप्टन शांभवी पाठक यांच्यावर कोणताही आक्षेप नाही. आमचा आक्षेप मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्यावर आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
दरम्यान, अजित पवारांच्या विमानाचा अपघात घडला, त्याच दिवशी (28 जानेवारी) व्हीएसआर या विमान कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांनी ‘विमानात काहीही तांत्रिक बिघाड नव्हता आणि पायलटही अनुभवी होता’ असे सांगितले होते.
रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार आहेत. तसेच, ते अजित पवार यांचे पुतणे आहेत.