केंद्र सरकारकडून नवी नियमावली जाहीर; सरकारी कार्यक्रमांत गीत वाजवणे अनिवार्य
केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’बद्दल नवे निर्देश जाहीर केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार, आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ गीत वाजवणे अनिवार्य असणार आहे. आता वंदे मातरम् राष्ट्रीय गीताच्या सन्मानार्थ सर्वांना उभे राहावे लागेल. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्त्वपूर्ण गीत ‘वंदे मातरम्’ला 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने केंद्र सरकारकडून देशभरात विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते.
नव्या निर्देशानुसार, आता सहा कडवी असलेल्या वंदे मातरमचे 3 मिनिट 10 सेकंदाचे गायन करावे लागणार आहे. यापूर्वी वंदे मातरम्ची दोन कडवी गायली जात होती, ज्यासाठी 65 सेकंदाचा वेळ लागत होता. झेंडा वंदन, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे कार्यक्रम, त्यांचे भाषण आणि राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी राष्ट्रीय गीत वाजवले जाणार आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत एकत्र वाजवायचे असल्यास राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आधी आणि नंतर राष्ट्रीय गीत वंदे मातरम् वाजवले जाईल. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि संवैधानिक संस्थांना यासंबंधीचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
‘वंदे मातरम्’चा थोडक्यात इतिहास
‘वंदे मातरम्’ हे गीत सर्वप्रथम बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतून 7 नोव्हेंबर 1875 रोजी प्रसिद्ध झाले, तेव्हापासून हे गीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गजर बनले. 1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत गायले गेले. त्यानंतर ते अधिकच लोकप्रिय झाले. विशेष म्हणजे, 1905 मध्ये बंगालच्या फाळणीविरोधात ‘वंदे मातरम्’ हे गीत एका महत्त्वाच्या साधनासारखे वापरले गेले.
सिनेमागृहात अनिवार्य नाही
तथापि, सिनेमागृहांना नवीन नियमांमधून सूट देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की चित्रपटगृहांमध्ये ‘वंदे मातरम्’ वाजवणे आणि चित्रपट सुरू होण्यापूर्वी उभे राहणे अनिवार्य राहणार नाही. वंदे मातरम्बद्दल स्पष्ट मार्गदर्शन करण्यासाठी नवीन सूचना देण्यात आल्या आहेत.
28 जानेवारी रोजी केंद्र सरकारने याबाबत नियमावली प्रसिद्ध केली आहे. 10 पानांच्या निर्देशात कोणकोणत्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम् अनिवार्य असेल, त्याची यादी देण्यात आली आहे. पद्म पुरस्कार सोहळ्यासारख्या नागरी पुरस्कार समारंभात किंवा राष्ट्रपती उपस्थित असलेल्या कोणत्याही कार्यक्रमात वंदे मातरम् वाजवले जाईल.