माजी आमदार ॲड. राधाराव ग्रासियस यांचा राज्य सरकारला इशारा;
तोमाझिन कार्दोज यांच्या ‘द बिट्रायल ऑफ कोंकणी इन रोमी स्क्रिप्ट’चे प्रकाशन
भारतीय घटनेने अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या भाषेचे शिक्षण घेण्याचा अधिकार दिलेला असून, राज्यातील अल्पसंख्याक समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांना इयत्ता पहिलीपासून कोकणी भाषा रोमी लिपीतून शिकविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये अल्पसंख्याक समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांना पहिलीपासून कोकणी भाषा रोमी लिपीतून शिकविण्यासाठी अर्ज सादर करावा. राज्य सरकारने कोकणी भाषा रोमी लिपीतून शिकविण्याच्या पालकांच्या मागणीची पूर्तता न केल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा माजी आमदार ॲड. राधाराव ग्रासियस यांनी काल दिला.
दाल्गादो कोकणी अकादमीने माजी सभापती तथा साहित्यिक तोमाझिन कार्दोज यांच्या ‘द बिट्रायल ऑफ कोंकणी इन रोमी स्क्रिप्ट’ या पुस्तकाच्या पहिल्या भागाच्या कला अकादमीत आयोजित प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
राज्य सरकारने कोकणी रोमी लिपीवर अन्याय केलेला आहे. कोकणी रोमी लिपीचा वापर पूर्वीपासून केला जात असताना कोकणी देवनागरीला राजभाषा आणि मराठीला सहभाषेचा दर्जा दिला आहे. आपण कोकणी रोमी लिपीवरील अन्याय दूर करण्यासाठी गोवा विधानसभेत एक विधेयक सादर केले होते; पण त्या विधेयकाला योग्य प्रमाणात पाठिंबा मिळाला नाही. नागालँड, मिझोराम, मेघालय या राज्यात स्थानिक भाषा रोमी लिपीतून शिकविल्या जात आहेत, असेही ग्रासियस यांनी सांगितले.
गोवा विधानसभेत कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी दहा ते बारा विधेयके सादर करण्यात आली. त्यात माजी आमदार हरक्युलानो दोरादो यांनी कोकणी रोमी लिपीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती. आपण 2005 नंतर इंग्रजी भाषेतून लिखाण करायला सुरूवात केली. त्यापूर्वीचे सर्व लिखाण कोकणी रोमी लिपीतून केले आहे, असेही तोमाझिन कार्दोज यांनी सांगितले.
तोमाझिन कार्दोज यांनी पुस्तकांच्या माध्यमातून कोकणी रोमी लिपीवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविला आहे. कोकणी रोमी लिपीमध्ये पत्रकारिता, तियात्र लेखन केले जाते. राज्य सरकारने राजभाषा कायदा संमत करताना कोकणी रोमीप्रेमींचा अपेक्षाभंग केला आहे, असे व्हिन्सी क्वाद्रोस यांनी सांगितले. यावेळी आयरिन कार्दोज, दोल्गादो अकादमीचे अध्यक्ष सेल्सो फर्नांडिस, उपाध्यक्ष विलियम फर्नांडिस, सचिव मायरन बार्रेटो यांची उपस्थिती होती.
कोकणी रोमी लिपीवर अन्याय झाला : ग्रासियस
आमच्या युवा पिढीला कोकणी रोमी लिपीचे शिक्षण न दिल्यास कोकणी रोमी लिपीवर भविष्यात विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोव्यात मराठी भाषेचा धार्मिक, साहित्य, संस्कृतीमध्ये वापर केला जात असल्याने सहभाषेचा दर्जा दिलेला आहे. कोकणी रोमीचा तियात्र, चर्च, मांडो आदींमध्ये पूर्वीपासून वापर होत आहे, तरीही कोकणी रोमी लिपीवर अन्याय करण्यात आला आहे, असेही राधाराव ग्रासियस म्हणाले.
कोकणी देवनागरीला कुठलाही इतिहास नाही
कोकणेी रोमी ही गोव्याची प्राचीन भाषा असून तिला मोठा इतिहास लाभलेला आहे, तर कोकणी देवनागरीला कुठलाही इतिहास लाभलेला नाही. तथापि, कोकणी देवनागरी भाषाप्रेमींनी कोकणी देवनागरीचे मोठ्या प्रमाणात गुणगान करून कोकणी रोमी लिपीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर देण्यासाठी आपण रोमी लिपीत कोकणीचा विश्वासघात हे पुस्तक लिहिले आहे, असे लेखक तोमाझिन कार्दोज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.