गोवा पुस्तक महोत्वसातील मुलाखतीत दिली ॲक्सिऑम मिशन-4 अंतराळ मोहिमेची संपूर्ण माहिती
भारतीय हवाई दलाचे वैमानिक, भारतीय अंतराळवीर, अशोकचक्र पुरस्कार विजेते कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी काल नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने पणजीत आयोजित करण्यात आलेल्या गोवा पुस्तक महोत्सवात ‘व्हेन ड्रीम्स डिफाइ ग्रेव्हिटी’ या विषयावर बोलताना जुलै 2025 मधील ॲक्सिऑम मिशन-4 या अंतराळ मोहिमेचा संपूर्ण प्रवास विद्यार्थी आणि अन्य उपस्थितांसमोर उलगडला.
2018 साली भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेची घोषणा करताना 2027 सालापर्यंत एखादी भारतीय महिला अथवा पुरुष गगनयान मोहिमेवर जाणार असल्याची घोषणा केली होती, तेव्हाच आपल्या मनात अंतराळवीर होण्याची इच्छा निर्माण झाल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
अंतराळ मोहिमेवर जाण्यासाठी आपणाला पाच वर्षे कडक प्रशिक्षण घ्यावे लागल्याचे शुक्ला यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 2019 साली इस्रोने गगनयान मोहिमेसाठी चार पुरुषांना प्रशिक्षण दिले. त्यात शुभांशू शुक्ला यांचा समावेश होता.
जुलै 2025 मध्ये ॲक्सिऑम मिशन-4 या मोहिमेखाली ते एका खासगी अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर झेपावले. आपल्या या मोहिमेची इत्यंभूत अशी माहिती शुक्ला यांनी यावेळी दिली. या अवकाश मोहिमेच्या उड्डाणाची चित्रफितही त्यांनी यावेळी दाखवली. उड्डाणाच्या प्रारंभीचा काळ हा अत्यंत कसोटीचा असा असतो. तो सर्वांत धोकादायक मानला जातो. आणि ते केवढे खरे आहे त्याचा अनुभव आपण घेतला असल्याचे शुक्ला यावेळी म्हणाले. यावेळी प्रचंड ऊर्जा व अति तापमान अशी स्थिती निर्माण होत असते. उड्डाणानंतरचा पुढील अर्ध्या मिनिटाचा काळ हा अक्षरश: जीवघेणा असतो. प्रचंड ऊर्जेमुळे त्यावेळची गती ही कल्पनेपलीकडची असते. यावेळी अंतराळवीरांचा श्वासही कोंडला जातो. यावेळी स्वत:ला कसे सावरावे व त्यासाठी काय करावे त्याचे खास असे प्रशिक्षण अंतराळवीरांना प्रशिक्षणाच्या काळात देण्यात आलेले असते. यावेळी छाती व फुफ्फुसांवर अतिप्रचंड दाब येतो. त्यामुळे घाबरगुंडी उडते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी कणखरपणाही तेवढाच महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.
अंतराळातून पृथ्वीवर खाली उतरतानाच्या अनुभवाविषयी सांगताना ते म्हणाले की, तेही उड्डाणाएवढेच आव्हानात्मक होते. अगदी खाली आल्यावर पॅराशूटद्वारे उतरताना पाठीला कुणीतरी मोठा धक्का दिल्यासारखी स्थिती निर्माण होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
आपण हवाई दलात ‘फायटर पायलट’ होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते, ते पूर्ण झाले; मात्र आपण अंतराळवीर होईन असे कधीच वाटले नव्हते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
पृथ्वी परतल्यानंतर चालताही येईना!
गुरुत्वाकर्षण नसलेल्या अंतराळातील वातावरणाशी जुळवून घ्यायला 8 ते 10 दिवस लागले. 18 दिवसांनंतर जेव्हा आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावरून परतलो तेव्हा आपले वजन 5 किलो कमी झाले होते. तसेच तेथून परतल्यानंतर धड उभे राहता येत नव्हते, तसेच चालताही येत नव्हते. चालताना तोल जात होता. डोळ्यांच्या पापण्यासुद्धा एवढा जड वाटत होत्या की त्या उघडतानाही प्रचंड वेदना व्हायच्या, असे शुक्ला यांनी सांगितले. खुर्चीवर बसतानाही पडल्यासारखे वाटायचे. गुरुत्वाकर्षण नसलेल्या वातावरणातून ते असलेल्या वातावरणात आल्याचा तो परिणाम होता, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले.
अंतराळात डोळे होतात मोठे अन् हृदय छोटे!
अंतराळात पोचल्यावर तेथील गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अभावामुळे अंतराळवीरांसह यानातील सर्व वस्तू हवेतच उडत असल्याने त्या वातावरणाशी कसे जुळवून घ्यावे लागते आणि त्यामुळे होणाऱ्या गमतीजमती तसेच आव्हाने याची माहिती शुक्ला यांनी दिली. तेथे तुम्ही कितीही अवजड वस्तू उचलू शकता, तेथे तुमचे वजन हे शून्य असते. गुरुत्वाकर्षणाअभावी शरीरातील रक्त डोक्यापर्यंत येते व परिणामी डोळे आकाराने मोठे होतात, तर हृदयाचा आकार छोटा होतो, शरीराची उंची वाढते. आपली उंची 6 सेंटीमीटरने वाढली होती; मात्र पृथ्वीवर परतल्यावर ती पूर्वीएवढीच झाल्याचे शुक्ला म्हणाले.