Home Featured मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट हटवली

मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट हटवली

0

युमनाम खेमचंद यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट अखेर अधिकृतपणे संपुष्टात आली असून, भाजपचे ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद यांनी मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल अजय भल्ला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मेतई समुदायाचे प्रभावी नेतृत्व आणि आरएसएसचे खंदे समर्थक मानले जाणारे खेमचंद यांच्या खांद्यावर आता मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

13 वे मुख्यमंत्री
भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री बनले आहेत. मैतेई समुदायाचे असलेले खेमचंद हे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचे जवळचे मानले जातात. नागा आमदार लोसी दिखो यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते नागा पीपल्स फ्रंटचे सदस्य आहेत. कुकी समुदायाच्या सदस्या नेमचा किपगेन यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दिल्लीतील मणिपूर भवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. दरम्यान, राज्याच्या गृहमंत्रीपदासाठी कोन्थोजम गोविंददास सिंह यांचे नाव चर्चेत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल बुधवारी राज्यातील 356 दिवसांपासून लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठवली. दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला. मे 2023 मध्ये मेतई आणि कुकी समुदायांत झालेल्या जातीय हिंसेमुळे मणिपूर होरपळून निघाले होते. या हिंसाचारात 260 हून अधिक लोकांचा बळी गेला, तर हजारो नागरिक बेघर झाले. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी राजीनामा दिला आणि केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. आता वर्षभरानंतर परिस्थिती सुधारत असल्याचे पाहून गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी करत राष्ट्रपती राजवट तातडीने मागे घेतली आहे.

मंगळवार दि. 3 फेब्रुवारी रोजी दिल्लीत मणिपूर भाजपच्या आमदार दलाची बैठक झाली होती. यामध्ये भाजप आमदार युमनाम खेमचंद सिंह यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. 4 फेब्रुवारी रोजी एनडीएच्या घटक पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले.
मणिपूरच्या 60 सदस्यीय विधानसभेत सध्या भाजपचे 37 आमदार आहेत.