Home Featured भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष30 जानेवारीपासून गोवा दौऱ्यावर

भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष30 जानेवारीपासून गोवा दौऱ्यावर

0

भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे चालू महिन्याच्या शेवटी म्हणजेच 30 व 31 जानेवारी असे दोन दिवस गोवा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती काल भाजपमधील सूत्रांनी दिली. त्यांचा हा गोवा दौरा 2027 सालच्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत.
काल गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक हे नितीन नबीन यांनी दिल्लीत घेतलेल्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत पक्ष संघटना बळकट करणे, विविध राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका, केंद्र व राज्य सरकारच्या योजना आदीसंबंधी चर्चा झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
नबीन हे आपल्या दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावेळी मुख्यमंत्री, मंत्री, पक्षाचे आमदार, पदाधिकारी, बूथ स्तरावरील कार्यकर्ते आदींची संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पक्ष संघटनेशी चर्चा करून आगामी विधानसभा निवडणुकांसंबंधीची रणनीतीची दिशा ठरवणार आहेत. यावेळी ते स्थानिक प्रश्न, विकासकामांचा आढावा घेणे व पक्षापुढील आव्हाने यावरही भर देणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनामुळे गोव्यातील भाजप संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यानी व्यक्त केला आहे.