Home बातम्या धुळापी रवळनाथ देवस्थानचा वाद चिघळला

धुळापी रवळनाथ देवस्थानचा वाद चिघळला

0

प्रशासकांनी विरोधी गटाकडे चावी दिल्याने ग्रामस्थ संतप्त; अद्याप तोडगा नाही

धुळापी-खोर्ली येथील श्री रवळनाथ देवस्थानातील वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. या देवस्थानची दुसरी चावी विरोधी गटाकडे सुपूर्द केल्याने संतप्त ग्रामस्थांनी तिसवाडी मामलेदार कार्यालयात शुक्रवारी सकाळी धडक मोर्चा नेत चावी परत घेण्याची मागणी केली. तथापि, रवळनाथ देवस्थानातील या वादावर कोणताही तोडगा संध्याकाळपर्यंत निघू शकला नव्हता.

श्री रवळनाथ देवस्थानच्या नवीन समिती निवडीचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात प्रलंबित आहे. या देवस्थानसाठी एका अस्थायी समितीचे निवड केली होती. तथापि, ही अस्थायी समिती सुध्दा रद्दबातल करून देवस्थानचा ताबा प्रशासकांनी आपल्याकडे घेतला आहे. प्रशासकाने देवस्थानमध्ये पूजा करण्याचे काम पूर्व परंपरेने देवकार्य करणाऱ्या व्यक्तीकडे सोपवून त्यांच्याकडे देवालयाची चावी दिली
होती.

तथापि, तीन दिवसांपूर्वी या देवस्थानची दुसरी चावी विरोधी गटाकडे देण्यात आल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. त्या विरोधी गटाने देवस्थानमध्ये पूजा केली. त्यामुळे देवस्थानचा कारभार हातळणाऱ्या प्रशासकाला म्हणजेच मामलेदारांना जाब विचारण्यासाठी शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी तिसवाडी मामलेदार कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन विरोध गटाला दिलेली चावी परत घेण्याची मागणी केली.

श्री रवळनाथ देवस्थानात कोणताही वाद नसताना मामलेदारांनी चावी विरोधी गटाकडे देऊन वाद निर्माण केला आहे. मामलेदारांनी या देवस्थानात गावातील दोन्ही गटांना कुठलाही अधिकार नाही, असा आदेश जारी केला आहे. तथापि, देवस्थानची एक चावी विरोधी गटाकडे कोणत्या आधारे दिली, असा प्रश्न फाल्गुन गावस यांनी पत्रकारांशी बोलताना केला.