धारबांदोडा, सांगे, काणकोण व केपे या तालुक्यांचा समावेश असलेल्या गोव्यातील तिसऱ्या कुशावती जिल्ह्याचे मंत्री रमेश तवडकर, सुभाष फळदेसाई व आमदार नीलेश काब्राल यांनी स्वागत केले असून, आनंदही व्यक्त केला आहे. काल पणजीत भाजपतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना वरील तिन्ही नेत्यांनी तिसऱ्या जिल्ह्याचे स्वागत केले.
पत्रकार परिषदेत मंत्री सुभाष फळदेसाई हे म्हणाले की, चार तालुक्यांतील सुमारे एक तृतीयांश लोक हे अनुसूचित जमातींतील आहेत. या तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेचा या लोकांना फायदा होणार आहे. परिणामी प्रशासनात गती येईल. त्यामुळे लोकांची कामे लवकर होतील. प्रलंबित प्रकरणानांही गती मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंत्री रमेश तवडकर यांनीही तिसऱ्या जिल्ह्याची मागणी पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून या जिल्ह्यामुळे प्रशासनात सुसूत्रता येईल व प्रशासन जलदगतीने होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
नीलेश काब्राल यांनीही तिसऱ्या जिल्ह्यामुळे धारबांदोडा, सांगे, काणकोण व केपे येथील म्हणजेच नव्या जिल्ह्यातील लोकांची कामे वेगाने होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट केले.
तिसऱ्या जिल्ह्याला विरोध करणाऱ्या विरोधकांवर यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी टीका केली व त्यांनी विरोध करण्याऐवजी चांगल्या सूचना कराव्यात, अशी मागणी केली.