
बनारस हिंदू विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थिनीच्या छेडप्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान शनिवारी रात्री हिंसाचाराच्या घटना घडल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेकजण जखमी झाले. जखमींमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच दोन विद्यार्थीनी तसेच दोन पत्रकारांचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने आज सोमवारपासून २ ऑक्टोबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विद्यापीठ संकुलातील हिंसक घटनांचा अहवाल देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. या प्रकरणी समाजवादी पक्षासह अन्य राजकीय पक्षांनी सरकारवर टीका करीत पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध केला.
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, जदयुचे नेते शरद यादव, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लाठीमाराचा निषेध केला आहे. दरम्यान या निदर्शनांना राजकीय स्वरूप आले असून या विद्यापीठाकडे येण्याच्या प्रयत्नात असलेले राज बब्बर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विद्यापीठ संकुलात सुमारे १५०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या महितीनुसार जोरदार निदर्शने चालू असताना निदर्शक विद्यार्थ्यांना शनिवारी रात्री विद्यापीठाच्या कुलगुरुंची त्यांच्या घरी भेट घ्यायची होती. त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करणार्या निदर्शक विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या काही विद्यार्थ्यांनी दगडफेक सुरू केली. त्यामुळे स्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
यावेळी या निदर्शनांचे वार्तांकन करणार्या पत्रकारांवरही लाठीमार झाल्याने लखनौमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लाठीमाराचा निषेध केला. जदयूचे नेते शरद यादव यांनीही या घटनेचा निषेध केला. हा विषय संसदेत उपस्थित करणार असल्याचे त्यानी सांगितले.