राज्यात करारापेक्षा जास्त विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना दंड ठोठावला जाणार आहे, असा इशारा राज्य सरकारच्या वीज खात्याने एका जाहीर सूचनेद्वारे दिला आहे.
वीज खात्याने संयुक्त वीज नियामक आयोगाने (जेईआरसी) जारी केलेल्या पाच वर्षांसाठीच्या नवीन वीज दराची अंमलबजावणी सुरू केली आहे. ह्या दर आदेशानुसार मंजूर किंवा करारापेक्षा जास्त विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडून दंड आकारला जाणार आहे. ग्राहकांना त्यांच्या विजेचा भार प्रत्यक्ष आवश्यकतेनुसार नियमित करण्याचे आवाहन वीज विभागाने केले आहे.
1 ऑक्टोबर 2025 ते आर्थिक वर्ष 2029-30 पर्यंत लागू असलेल्या सुधारित दर आदेशात ग्राहक श्रेणीमध्ये नवीन बिलिंग पॅटर्नचा वापर केला जात आहे. घरगुती ग्राहकांना 300 युनिट्सपेक्षा जास्त दरांसह स्लॅब सिस्टमवर बिल आकारले जाईल, तर व्यावसायिक वापरकर्त्यांना लोड-लिंक्ड टॅरिफ आणि उच्च पीक-अवर शुल्कांना सामोरे जावे लागणार आहे.
औद्योगिक ग्राहकांना मागणी शुल्कासह दोन-भागांच्या दर प्रणाली अंतर्गत बिल आकारले जाणार आहे. या आदेशात दिवसाच्या वेळेचे दर, छतावरील सौर अवलंबनासाठी प्रोत्साहने देखील समाविष्ट आहेत आणि ग्रीड ओव्हरलोडिंग रोखताना कार्यक्षम ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खात्याच्या अधिकृत वेबसाइटवर तपशीलवार दर माहिती तपासण्याचे आवाहन वीज खात्याने ग्राहकांना केले आहे. दरम्यान, वीज खात्याने दोन वर्षांपूर्वी वीज ग्राहकांना आपला विजेचा भार तपासून गरज असल्यास वाढवून घेण्याचे आवाहन केले होते.
अतिरिक्त वीज वापरामुळे
यंत्रणेवर ताण
वीज खात्याकडून राज्यात विजेच्या एकूण वापरानुसार विजेची खरेदी केली जाते. काही वेळा जास्त विजेचा वापर होत असल्याने ट्रान्स्फॉर्मर आणि वीज यंत्रणेवर अतिरिक्त ताण येऊन वीज पुरवठा वरच्या वर खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे ग्राहकांकडून केला जाणारा विजेचा वापर निश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील विजेच्या वाढत्या मागणीनुसार आवश्यकतेनुसार अतिरिक्त विजेची खरेदी केली जाऊ शकते, असे वीज खात्याच्या अधिकाऱ्याने
सांगितले.