राज्य सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे ओळखपत्र गळ्यात घालणे सक्तीचे केले आहे. ओळखपत्र न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात ओळखपत्र गळ्यात घालणे बंधनकारक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. सरकारी कार्यालयांत कामावर असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले ओळखपत्र घालणे आवश्यक आहे. तसेच, कार्यालयाच्या कामानिमित्त बाहेर जातानाही ओळखपत्र गळ्यात असणे आवश्यक आहे.
ओळखपत्राबाबत अनेक वेळा सूचना देऊनही त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे ओळखपत्र देण्याचा उद्देश साध्य होत नाही. ओळखपत्र हे कार्यालयीन शिस्त, लोकांना सरकारी कर्मचाऱ्यांची ओळख पटावी व सरकारी कार्यालयात सुरक्षा व्यवस्था बळकट करणे यासाठी देण्यात येत आहे. तथापि, कर्मचारी सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले आहे. यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत.
सरकारच्या सर्व विभाग प्रमुख, महामंडळांचे प्रमुख व सरकारी कार्यालयांशी संबंधितांनी सरकारी कर्मचारी ओळखपत्र गळ्यात घालतात की नाही याची तपासणी करावी. जो कर्मचारी आदेशाचे पालन करून नाही त्यांच्यावर केंद्रीय नागरी सेवा नियम, 1964 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करावी, असे सूचनेत
म्हटले आहे.