पोरबावाडो-कळंगुट येथील एका घराची देखभाल करणाऱ्या 62 वर्षीय वृद्धाचा खून केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास घडली. शिपाद देबनाथ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी कमल अधिकारी (सध्या रा. कळंगुट, मूळ पश्चिम बंगाल) याला काल अटक केली.
शिपाद देबनाथ हा पोरबावाडो कळंगुट येथील एका जुन्या घराची देखभाल करण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून करीत होता. या घराचे मालक मुंबई येथे राहत असून, त्या मालकाने घराची देखभाल करणाऱ्या शिपाद देबनाथ याची राहण्याची व्यवस्था घराच्या मागील बाजूच्या खोलीत केली होती. घराची देखभाल करणारा शिपाद आणि संशयित आरोपी कमल यांच्यात गुरुवारी पहाटे 2.30 च्या सुमारास जोरदार भांडण झाले. संशयिताने शिपाद यांच्यावर धारदार शस्त्राच्या साहाय्याने हल्ला केला. त्यात शिपाद हे गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचे जागीच निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संशयिताला ताब्यात घेतले.