तळपण पुलानजीक दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
गोव्यात नववर्ष साजरे करून कर्नाटकात परतणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा
मडगाव-कारवार महामार्गावरील तळपण पुलानजीक दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या स्वयंअपघातात जागीच मृत्यू झाला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. मेलरी निंगप्पा बोवीवबार (रा. जयंतीनगर, किरवत्ती, उत्तर कर्र्नाटक) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण आपल्या केए-31-इजी-4319 या बुलेट दुचाकीवरून काणकोणहून पोळेकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तळपण पुलानजीक रस्त्याबाजूच्या एका झाडाला पहिल्यांदा धडक दिली. त्या धडकेबरोबर झाड मोडले आणि दुचाकीचालक तरुण दहा मीटर अंतरापर्यंत फरफटत गेला. त्याचे हेल्मेट खाली पडले आणि डोक्याला मार लगला.
या घटनेची माहिती मिळताच काणकोण पोलिसांनी सदर जखमी व्यक्तीला काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याचा मृतदेह मडगावच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. काणकोणचे पोलीस निरीक्षक हरिष रा.देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल वेळीप पुढील तपास करीत आहेत.