पंचायत संचालकांचा आदेश; गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांचेही निलंबन
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील अग्नितांडव प्रकरणात निलंबित केलेल्या हडफडे नागवा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, तर हडफडेचे सरपंच रोशन रेडकर यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच त्यांचे पंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासंबंधीचा आदेश पंचायत संचालक महादेव आरोंदेकर यांनी काल जारी केला. याशिवाय गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
बर्च या नाईटक्लबमधील भीषण आगीत 25 जणांचा बळी गेल्यानंतर राज्य सरकारने पंचायत सचिव रघुवीर बागकर याला 7 डिसेंबर रोजी सेवेतून निलंबित केले होते. पंचायत सचिवाच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. क्लबला व्यापार परवाना देताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
हडफडे पंचायतीचे तत्कालीन निलंबित पंचायत सचिव रघुवीर बागकर यांच्याविरोधात हणजूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर रघुवीर बागकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी म्हापसा अतिरिक्त जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता. सदर अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने 30 डिसेंबरला फेटाळून लावला. निलंबित सचिव बागकर हा खातेनिहाय चौकशी टाळत आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले आहे, असेही आदेशात म्हटले आहे.
दोन अधिकाऱ्यांचे निलंबन
बर्च आग प्रकरणामध्ये गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या आग प्रकरणात गुंतलेल्यांची गय केली जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बनावट कागदपत्रे केली तयार
क्लबच्या मालकांनी अनेक बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. आरोग्य प्रमाणपत्र, पोलीस पडताळणी आदी कागदपत्रे बनावट आहेत. त्यांनी केवळ स्थानिक पंचायत सरपंच आणि सचिवांकडून परवानगी घेतली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चुकीचे निरीक्षण अहवाल
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने वैज्ञानिक साहाय्यक अधिकारी चैतन्य साळगावकर आणि कनिष्ठ पर्यावरणीय अभियांत्रिकी अधिकारी विजय कानसेकर यांचे निलंबन केले आहे. त्यांनी चुकीचे निरीक्षण अहवाल दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव शर्मिला मोन्तेरो यांना निलंबित केले होते.