गोव्यात भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असून, त्यात भाजपमधील काही जणांचा हात आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यासंबधी सर्व माहिती मी माझ्या जवळच्या सूत्रांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. यापुढेही भाजप सरकारमधील भ्रष्टाचार आपण उघडकीस आणणार आहे. पक्षाने कोणतीही कारवाई केली, तरी मी त्याची पर्वा करणार नाही, असे भाजपच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी प्रवक्ते सावियो रॉड्रिगीस यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले.
भाजपमधील बजबजपुरी थांबवायची असेल, तर संघटनमंत्री सतीश धोंड यांना पुन्हा गोव्यात आणण्याची गरज असल्याचे रॉड्रिगीस यांनी सांगितले. आपण केंद्रीय भाजप नेत्यांकडे तशी मागणी केली आहे, असेही ते म्हणाले.
आपण भाजपविरोधात नाही, तर प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सावियो रॉड्रिगीस हे पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य नसल्याचे म्हटले होते. त्याबाबत विचारले असता सावियो रॉड्रिगीस म्हणाले, जून 2024 मध्ये जी राज्य कार्यकारिणी जाहीर झाली होती, त्यात माझे नाव आहे. या कार्यकारिणीत बदल झाला असेल, तर त्याची मला कल्पना नाही.
दरम्यान, हे प्रकरण आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यापर्यंत पोहोचले असल्याचे समजते.
दरम्यान, पहिल्यादांच निवडून आलेल्या भाजपच्या एका आमदाराने भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याचा गृहनिर्माण प्रकल्प मंजूर करण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपूर्वी सावियो रॉड्रिगीस यांनी केला होता. प्रकल्पासाठी एका मंत्र्याला पैसे द्यायचे आहेत, असे सदर आमदाराने म्हटले होते. कालांतराने ज्या कार्यकर्त्याकडून पैसे घेतले होते, त्याला कार्यकारिणीमध्ये वरिष्ठ पदावर बढती मिळाली असता त्याने त्या मंत्र्याकडे चौकशी केली असता मंत्र्याने आपण पैसे घेतले नसल्याचे सांगितले. यानंतर त्या आमदाराला बोलावून पैसे परत करण्यास सांगितले होते. विशेष म्हणजे त्या आमदाराने ती रक्कम परत केली, असे सावियो रॉड्रिगीस यांनी म्हटले होते.