Home Featured लुथरा बंधूंच्या पोलीस कोठडीत वाढ

लुथरा बंधूंच्या पोलीस कोठडीत वाढ

0

म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील भीषण आग प्रकरणातील संशयित आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्या पोलीस कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ काल केली. लुथरा बंधूंना 29 डिसेंबरपर्यंत हणजूण पोलीस स्थानक कोठडीत ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, म्हापसा येथील न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी भरत कोहली याला सशर्त जामीन काल मंजूर केला. न्यायालयाने त्याची 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर सुटका करण्याचे आदेश दिले.

दुसऱ्या बाजूला, बनावट आरोग्य ना हरकत दाखला प्रकरणामध्ये बर्च नाईटक्बलचे मालक सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूनी अटकपूर्व जामिनासाठी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने या प्रकरणामध्ये संशयित लथुरा बंधूंना 30 डिसेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
या बनावट दाखला प्रकरणात म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, क्लबचे सहमालक अजय गुप्ता याला अटक केली आहे. लथुरा बंधूंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या 30 रोजी सुनावणी घेतली जाणार असून, न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला नोटीस जारी केली आहे.

सरन्यायाधीशांकडून घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील भीषण आग दुर्घटनेबद्दल भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काल तीव्र शोक व्यक्त केला. या भीषण आगीमध्ये अनेक तरुणांचे प्राण गेले. त्यात पर्यटक आणि कुटुंबाला आधार देणाऱ्या कामगारांचा समावेश होता. त्यातून कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे, असेही सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.