बंदरवाडा-डिचोली येथे बसस्थानकाच्या मागील बाजूला पार्क केलेल्या खुल्या जीपमध्ये काल एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. सदर महिलेच्या नाकावर जखम असल्याने खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला अंदाजे 55 वर्षांची असून, लक्ष्मी शिरोडकर नामक ही महिला मूळ तळेवाडा-माटणे येथील असल्याचे सांगितले जात आहे. ती या ठिकाणी राहत असल्याचे सांगण्यात आले.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सदर महिला या परिसरात फिरायची व या ठिकाणी रात्री एका व्यक्तीबरोबर तिचे भांडण झाले होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय राणे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. तसेच फॉरेन्सिक टीमने नमुने घेतले. पोलिसांनी संशयावरून एका इसमास ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.