भाजपचे आमदार गोविंद गावडे यांनी मगो पक्षाच्या सिंह निशाणीविरूद्ध अपमानास्पद उद्गार काढलेले असून, यापुढे आम्हाला त्यांच्याबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. त्यांनी सिंहाच्या निशाणीविरूद्ध तर अपमानस्पद उद्गार काढलेले आहेतच, त्याचबरोबर आमच्या आई-वडिलांविषयीही वाईट उद्गार काढलेले आहेत. हे सगळे सहन करण्यापलीकडेच आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे आम्हाला त्यांच्याबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नसल्याचे मगो नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हे जिल्हा पंचायत निवडणूक निकालानंतर गोव्यात आले असता त्यांनी आमदारांची बैठक घेतली होती. त्यावेळी आमदार गोविंद गावडे यांनी मगो पक्ष हा भाजपच्या युतीतील घटक पक्ष असतानाही बेतकी खांडोळा जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासाठी मगोने काम केले नसल्याचा आरोप गावडे यांनी केला होता. मगोने काम न केल्यानेच तेथे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे सांगून याबाबत कारवाई व्हावी, अशी मागणी गावडे यांनी बी. एल. संतोष यांच्याकडे केली होती. याबाबत पत्रकारांनी ढवळीकर यांना विचारले असता ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वीच आम्ही भाजपश्रेष्ठींना याविषयी काय ते सांगितले होते. बेतकी-खांडोळा मतदारसंघ आम्हाला द्यावा, तो दिला नाही तरीदेखील स्थानिक आमदारांसोबत आघाडीच्या उमेदवारांसाठी काम करण्याचे आम्ही कार्यकर्त्यांना सांगितले होते. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत काम केले नाही, असे ढवळीकर म्हणाले.