हडफडे येथील काल मध्यरात्रीचे अग्निकांड सुन्न करणारे आहे. केवळ मृतांचा आकडा मोठा आहे म्हणून नव्हे, तर ज्या बेफिकिरीमुळे ही आग लागली आणि क्षणार्धात पसरली, ज्या बेफिकिरीमुळे ह्या आगीमध्ये एवढी मोठी प्राणहानी झाली आणि ज्या बेफिकिरीमुळे अशा प्रकारचा नाईटक्लब सगळे कायदेकानून धुडकावत खुलेआम सुरू होता हे सगळेच गोव्याच्या पर्यटनक्षेत्रातील अनागोंदीकडे बोट दाखवणारे आणि म्हणूनच सुन्न करणारे आहे. आगीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसे किड्यामुंग्यांप्रमाणे जळून मृत्यूमुखी पडली आहेत. हा घातपात नसेल अशी आशा आहे. परंतु क्षणार्धात ती आग संपूर्ण इमारतीत पसरणे आणि इमारत संपूर्णतः आगीने वेढली जाणे हे भीषण आहे आणि कमालीच्या बेफिकिरीकडेच बोटे दाखवते आहे. मुळामध्ये हा नाईटक्लब मध्यरात्रीनंतर सुरू कसा होता हा पहिला प्रश्न. दुर्घटनेची माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचा उल्लेख हेतूतः रेस्तराँ असा करीत होते. पोलिसांना आगीची खबर बारा वाजता मिळाली असे सांगत होते. म्हणजे मुळात हा नाईटक्लब नव्हे तर केवळ रेस्तराँ असून दुर्घटना घडली तेव्हा तो बंद करण्याची तयारी चाललेली होती असे भासवण्याची त्यांची धडपड त्यातून स्पष्ट दिसून आली. ह्या दुर्घटनेत लागलेली आग ही पहिल्या मजल्यावर लागली आणि तिथून ती सर्वत्र पसरली. मृतांची जी संख्या सांगितली गेली त्या 25 पैकी 20 जण सदर हॉटेलचे कर्मचारी असल्याचे पोलीस म्हणत आहेत. एवढ्या रात्री स्वयंपाकघरातच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी होते ह्याचाच अर्थ ते त्यावेळी पूर्ण क्षमतेने सुरू होते. ह्या स्वयंपाकघरात जाण्यायेण्यास एकच वाट होती असेही आता उघडकीस आले आहे. नाईटक्लबच्या इमारतीत अग्निप्रतिबंधक उपाययोजना केलेल्या होत्या असेही दिसत नाही. तसे असते तर त्या कार्यान्वित होऊन आगीची तीव्रता कमी होऊ शकली असती. अशा प्रकारच्या नाईटक्लबमध्ये सजावटीसाठी जिचा प्रामुख्याने वापर होतो ती आगीला आमंत्रण देणारीच असते. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी ठिकठिकाणी फायर हायड्रंटस्, इलेक्ट्रिक सर्किट ब्रेकर, अग्निप्रतिबंधक रसायने भरलेल्या सिलिंडरांची तैनाती गरजेची असते. शिवाय कर्मचारी अशा प्रकारच्या संभाव्य आगीच्या धोक्यास सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षित असणेही गरजेचे असते. परंतु ह्या ज्या सुरक्षाविषयक उपाययोजना कोणत्याही आस्थापनामध्ये आवश्यक असतात, त्यांकडे कधीच लक्ष दिले जात नाही, त्यातून अशा दुर्घटनांची तीव्रता वाढते. मुळामध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अशी दुर्घटना होऊ नये ह्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या आहेत ना ह्याची खातरजमा करणारे फायर ऑडिट ठराविक काळानंतर होणे गरजेचे असते. ह्या नाईटक्लबच्या बाबतीत असे काही झालेले दिसत नाही. अशा बेकायदेशीर गोष्टींवर ह्यापुढे कडक कारवाई केली जाईल असे सरकार आता म्हणते आहे. परंतु दोन डझन लोकांचा बळी गेल्यानंतर कारवाई करून उपयोग काय? काल मध्यरात्री दुर्घटना घडताक्षणीच दिवस उजाडण्याआधीच थेट पंतप्रधान कार्यालयातून मृतांना दोन लाख आणि जखमींना पन्नास हजारांची घोषणा झाली. एवढ्या घाईघाईने ही घोषणा होण्यामागे राज्यात तोंडावर असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुका हेच कारण असावे. परंतु हा विषय राजकीय फायद्या तोट्याचा नव्हे. हा गोव्याच्या पर्यटनाच्या भवितव्याचा आणि त्याला मिळालेल्या चुकीच्या दिशेचा प्रश्न आहे. मुळात गोव्याच्या पर्यटनक्षेत्रामध्ये किती गोष्टी अधिकृत आहेत आणि किती अनधिकृत आहेत हे तरी सरकारला ठाऊक आहे काय? गोवा हे पर्यटनाभिमुख राज्य असल्याने येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांना नाना प्रकारच्या वैध आणि अवैध सेवा पुरवणाऱ्यांचा येथे सुळसुळाट झाला आहे. विशेषतः गोव्याच्या किनारपट्टीत तर बेकायदेशीर गोष्टींना ऊत आलेला आहे आणि स्थानिक राजकारण्यांचीच त्यांच्यावर कृपादृष्टी आणि अनेक बाबतींत सक्रिय सहभाग आहे. ते कमी म्हणून आता दिल्ली आणि इतर प्रांतांतील मंडळी गोव्यामध्ये स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून नाना तऱ्हेेचे व्यवसाय थाटून बसलेली आहेत. कायदेकानून फक्त सामान्य माणसांना, ह्या धनदांडग्यांना सगळे माफ अशीच राज्यात स्थिती आहे. हडफडे येथील दुर्घटनेने ह्या सगळ्या गैरगोष्टींवरील पडदा वर ओढला आहे. आता जर अशा गैरगोष्टींची चौकशी झाली तर भरपूर काही बाहेर येईल. सरकारची त्यामागे जाण्याची तयारी आहे का? प्रत्येक पंचायतक्षेत्रात चालणाऱ्या व्यवसायांपैकी किती अधिकृत आहेत, किती अनधिकृत आहेत, सर्व प्रकारच्या कायदेकानूनांचे पालन कितीजण करतात आणि दुर्लक्ष कितीजणांकडून होते, ह्या सगळ्याच्या मुळाशी जाण्याची सरकारची तयारी आहे काय? नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर झालेल्या ह्या दुर्घटनेने गोव्याची छबी आंतरराष्ट्रीय स्तरावर कलंकित केलेली आहे, तो कलंक सरकार पुसून काढील काय?