Home Featured आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाला घर, दुचाकी देणारे दोघेजण अडचणीत

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाला घर, दुचाकी देणारे दोघेजण अडचणीत

0

हणजूण पोलिसांनी अमलीपदार्थ प्रकरणात अटक केलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया ज्युड बुशारी याच्याबाबत माहिती न देणाऱ्या शिवोली येथील घरमालक कमलाकांत बाणावलीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दुचाकी भाडेपट्टीवर दिलेल्या दुचाकी मालकाविरुद्ध कारवाईसाठी न्यायालयात अहवाल सादर केला आहे. तसेच त्या दुचाकीचे नोंदणी प्रमाणपत्र रद्दसाठी विभागीय वाहतूक कार्यालयात अहवाल पाठविण्यात आला आहे.

हणजूण पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्युड बुशारी हा शिवोली येथील कमलाकांत बाणावलीकर यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे उघडकीस आले. त्याच्याबाबत घराच्या मालकाने एफआरआरओ पणजी येथे ‘सी’ फॉर्म पाठवला नसल्याचे स्पष्ट झाले.

तसेच, दुचाकी भाडेपट्टीवर देणाऱ्या आसगाव येथील नीलिमा माद्रेकर यांना नोटीस बजावली आहे. ज्युड बुशारीने मांद्रेकर यांची दुचाकी क्रमांक जीए-03-बीडी-1164 भाडेपट्टीवर घेतली होती. त्यासाठी तो दरमहा 5000 रुपये भाडे देत होता, असेही तपासात आढळून आले. मांद्रेकर यांच्याविरुद्ध स्थानिक न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. तसेच, त्या दुचाकीचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करणारा अहवाल म्हापसा येथील साहाय्यक वाहतूक संचालकांना पाठवला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.