Home Featured लालबागच्या राजाचा संदेश

लालबागच्या राजाचा संदेश

0

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील लालबागचा राजाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन कधी नव्हे ते आठ तास रखडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. विसर्जन मिरवणुकीला झालेला विलंब, परिणामी टळून गेलेली समुद्रातील ओहटीची वेळ, समुद्रात ग्रहणामुळे उसळलेल्या लाटा यामुळे हे विसर्जन रखडले. लालबागच्या राजाची भव्य मूर्ती असलेली ट्रॉली वाळूत रुतली आणि ती मूर्ती हायड्रॉलिक तराफ्यावर चढवणे भरतीमुळे समुद्रात लाटा उसळत असल्याने कठीण होऊन बसले. त्यामुळे कार्यकर्त्यांना समुद्रात पुढील ओहटी येण्याची प्रतीक्षा करावी लागली. मग महत्प्रयासाने एकदाचा हा बाप्पा मोटराइज्ड विसर्जन तराफ्यावर चढवला गेला. ह्या सगळ्या खटाटोपात एकूण विसर्जन मिरवणुकीला 33 तास लागले. लाखो भाविकांच्या श्रद्धेची आणि संयमाची कसोटीच ह्यावेळी पाहिली गेली यात शंका नाही. मात्र, ह्या घटनेने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सध्याच्या स्वरूपाबाबत काही प्रश्न निश्चितच उपस्थित झालेले आहेत. जनतेमध्ये राष्ट्रीय भावना जागृत व्हावी ह्यासाठी लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. आज सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना गावोगावी रुजली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. उत्साहात, आनंदात हा सण अशा प्रकारे सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला कोणाची हरकत असण्याचे काही कारण नाही. मात्र, गणेशोत्सवामध्ये ज्या अनेक अनिष्ट गोष्टींनी शिरकाव केलेला दिसत आहे, जो भपका प्रधान बनला आहे, त्याबाबत वेळीच उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे. आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये पराकोटीची स्पर्धा लागलेली दिसून येते. त्यामुळे एकमेकांपेक्षा मोठ्या मूर्ती बनवण्यापासून आपली विसर्जन मिरवणूक अधिकाधिक भव्य करण्याची चुरस लावण्यापर्यंत नाना प्रकार केले जाताना दिसतात. ह्याबाबत सातत्याने चर्चा होत असते. धार्मिक भावना ह्या विषयात गुंतलेल्या असल्याने सरकारकडून कायदेकानूनांच्या कार्यवाहीबाबत थोडा संयम बाळगला जातो. परंतु अनेक मंडळांमध्ये श्रद्धेपेक्षा झगमगाट आणि दिखाऊगिरी ह्यालाच जास्त महत्त्व दिले जात तर नाही ना हा प्रश्नही उपस्थित होतो आहे. मुंबई काय, पुणे काय विविध शहरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुका यंदाही लांबल्या. मुंबईत तर ह्या मिरवणुकीचे सर्वांत मोठे आकर्षण असणारा लालबागचा राजाच कित्येक तास पाण्यात अडकण्याची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कोळी बांधवांनी हा बाप्पा आज ‘पैशाचा बाप्पा’ झाला असल्याची जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली ती बोलकी आहे. कोट्यवधी रुपयांचे दान अशा प्रकारच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गंगाजळीत गणेशोत्सवाच्या काळात पडत असते. आपल्या गणेश मंडळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी सेलिब्रिटींना बोलावणे वा त्यांच्या भेटीची खास व्यवस्था करणे हे प्रकारही आता नेहमीचे झाले आहेत. एकीकडे ह्या अतिमहनीय व्यक्तींसाठी पायघड्या अंथरणारी ही मंडळे सर्वसामान्य श्रद्धावान भाविकांशी मात्र मुजोरी करीत असल्याचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. गर्दीच्या नियंत्रणासाठी काही मंडळे अलीकडे थेट बाऊन्सर्स तैनात करीत असतात. त्यांच्याकडून गुंडगिरी होते. क्षुल्लक कारणांवरून भाविकांशी गैरवर्तन करणे, त्यांना दर्शन घेऊ न देता ढकलून देणे असे प्रकार घडतानाची दृश्ये एकीकडे, तर व्हीआयपीभोवती गोंडा घोळणारे मंडळांचे पदाधिकारी दुसरीकडे असे विसंगत चित्र त्यात दिसते. त्यामुळे सध्या समाजमाध्यमांवर टीकेचा भडिमार चालला आहे, त्या टीकेत निश्चित तथ्य आहे.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत पाच मानाच्या गणपतींचे विसर्जन सर्वांत आधी करण्याची प्रथा आहे. त्यासाठी त्यांच्यासोबत पारंपरिक ढोल, ताशा, झांज व ध्वजपथके असतात. शानदाररीत्या ही मिरवणूक निघते. मात्र, त्यानंतर इतर अनेक गणेश मंडळे प्रचंड ध्वनिप्रदूषण करणारे डीजे लावून तद्विषयक कायदे कानूनांचे सरळसरळ उल्लंघन करून ह्या मिरवणुकीत धिंगाणा घालत असतात. डीजे, प्लाझ्मा ह्यांचा ढणढणाट करण्यापेक्षा पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीत जी शान असते तिचा थाट काही और असतो हे ह्या मंडळांना सांगणार कोण? गोव्यामध्ये गणेशोत्सवात बड्या बक्षीसांच्या लॉटरीचा काही मंडळांकडून जो सरळसरळ व्यवसाय चालला आहे, तसले गणेशोत्सवातील गैरप्रकार दूर करा, दिखाऊगिरी थांबवा आणि विघ्नहर्त्याचा हा उत्सव, आनंदात, उत्साहात, जल्लोषात, परंतु श्रद्धेने साजरा करा असा संदेशच जणू लालबागच्या राजाने परत जाण्याआधी मागे थांबून आपल्याला दिलेला आहे.