मुलाखत ः बबन भगत
कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांचे प्रतिपादन
गोव्याची संस्कृती, लोकजीवन व लोकवेद हा खूप समृद्ध असून त्याचे दर्शन हे संपूर्ण जगाला घडायला पाहिजे. देश-विदेशात गोव्याची जी एक वेगळीच प्रतिमा आहे ती पुसून टाकून गोव्याची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे काम त्याद्वारे केले जाऊ शकते, असे काल कला व संस्कृती, क्रीडा व आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी दै. नवप्रभाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले.
प्रश्न ः गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला व दिगंबर कामत यांना मंत्रीपद मिळाले. नंतर गणेश चतुर्थीच्या शुभदिनी तुम्हा दोघांना खाते वाटप झाले. आता मंत्री म्हणून तुमचे प्राधान्यक्रम काय असतील?
तवडकर ः मला क्रीडा व युवा व्यवहार, कला आणि संस्कृती, आदिवासी कल्याण ही खाती मिळालेली आहे. या तिन्ही खात्यांसाठी माझे वेगवेगळे प्राधान्यक्रम असतील. ही खाती माझ्यासाठी नवीन नाहीत. यापूर्वीही ही तिन्ही खाती माझ्याकडे होती. या खात्यांपैकी आदिवासी कल्याण या खात्याविषयी बोलायचे झाल्यास या खात्यातील सगळ्या योजनांची यापूर्वी मंत्री असताना मी सुयोग्य पद्धतीने रचना केली होती. चुकून या योजनांमध्ये काही त्रुटी राहून गेल्या असतील तर अभ्यास करुन त्या दूर केल्या जातील. शिवाय आवश्यकता असल्यास व सुधारणा करण्यास वाव असल्यास वेगवेगळ्या योजनांमध्ये सुधारणाही घडवून आणल्या जातील. आदिवासी कल्याणासाठी आदिवासींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणे व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांद्वारे त्यांच्यासाठी लहान-मोठे प्रकल्प उभारणे, त्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे व त्यांच्यामध्ये सर्वच गोष्टीबाबत जागृती घडवून आणणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कला आणि संस्कृती या खात्याविषयी बोलायचे झाल्यास हे खाते खूप महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. गोव्याची कला व संस्कृती याची जोपासना करणे व त्याचे दर्शन केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला घडवणे हे या खात्याचे काम आहे. मी गेल्या 25 वर्षांपासून काणकोण मतदारसंघात लोकोत्सवाचे आयोजन करीत आलेलो आहे. त्याद्वारे मी गोव्यातील आदिवासी लोकांचे जीवन, संस्कृती व परंपरा याबरोबरच एकूण ग्रामीण जीवनाचे दर्शन गोव्यातील लोकांबरोबरच देश-विदेशांतील लोकांना घडवून देण्याचे काम केलेले आहे. गोव्यातील महान अशा या संस्कृती व परंपरेचे दर्शन संपूर्ण जगाला व्हायला हवे, असे मला वाटते. त्यादृष्टीने कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री म्हणून काम करण्यास प्राधान्य देणार आहे. गोव्यातील ग्रामीण जीवन, संस्कृती, परंपरा, लोकवेद याचे जगाला दर्शन घडवण्यास खूप वाव आहे. जगभरातील लोकांना त्यात रस आहे, जिज्ञासा आहे हे वेळोवेळी दिसून आलेले आहे. या सगळ्याचा प्रसार केल्यास जगासमोर गोव्याची एक वेगळीच प्रतिमा निर्माण होऊ शकते. हे काम करण्यास आम्ही कमी पडल्याने जगभरात गोव्याची एक वेगळीच प्रतिमा निर्माण झालेली आहे.
प्रश्न ः क्रीडा खात्याविषयी काय सांगाल?
तवडकर ः वर सांगितल्याप्रमाणे हेही खाते मी यापूर्वी सांभाळलेले आहे. यापूर्वी जेव्हा मी क्रीडामंत्री होतो तेव्हा मी क्रीडाविषयक मोठी साधनसुविधा उभारली होती. ती म्हणजे वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांसाठीची स्टेडियम, जलतरण तलाव, मैदाने आदींचा उपयोग हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी व्हायला हवा. तसे होईल तेव्हाच गोव्यात मोठमोठे क्रीडापटू निर्माण होऊ शकतील. वेगवेगळ्या खेळांविषयीची त्यांना माहिती मिळू शकेल. त्याविषयीचे ज्ञान व कौशल्य त्यांना आत्मसात करता येईल आणि पर्यायाने त्या – त्या खेळांविषयी त्यांच्या रुचीही निर्माण होऊ शकेल. राज्यातील क्रीडापटू व क्रीडाक्षेत्रातील तज्ज्ञांशी याबाबत बोलून पुढील रुपरेषा ठरवणे हा माझा क्रीडा क्षेत्रासाठीचा प्रधान्यक्रम असेल.
प्रश्न ः आणखी दीड वर्षाने गोवा विधासभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे काम करण्यासाठी वेळ खूप कमी आहे, असे आपणाला वाटते काय?
तवडकर ः वेळ तसा कमी आहेच पण म्हणून हताश होणाऱ्यांपैकी मी नाही. योग्य प्रकारे नियोजन व संघटन करून काम केल्यास कमी वेळात वेगाने कामे करणे शक्य आहे. मी एकटा काम करीत नाही आणि हे एकट्याने करण्याचे काम नाही. माझ्याकडे संघटन कौशल्य आहे. त्याबाबत मी गेली 25 वर्षे लोकोत्सव करू शकलो. लोकोत्सवाबरोबरच आता राज्यातील गरीब व दुर्बल लोकांना त्यांचे हक्काचे घर बांधून देण्याचे काम श्रमधाम योजनेद्वारे करीत आहे. जनतेच्या सहकार्याने व मदतीनेच ही काम केली जात आहेत. माझी पुढील वाटचाल ही अशीच असणार आहे.
प्रश्न ः आपण शिक्षण खात्यासाठी आग्रही होता, असे बोलले जाते आहे. त्याविषयी सांगा.
तवडकर ः ते खरे आहे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे शिक्षणखात्याची मागणी केली होती. मी स्वतः एक शिक्षक आहे. त्याशिवाय माझी स्वतःची एक शिक्षण संस्थाही आहे. शिक्षण विषयात मला रुची आहे, आवड आहे. आणि शिक्षण क्षेत्राविषयी माझा चांगला अभ्यासही आहे. राज्यात भाजप सत्तेवर आल्यापासून (2012 ते आतापर्यंत) शिक्षण खाते हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे. मुख्यमंत्री कामात खूप व्यस्त असतात. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना शिक्षण खात्याकडे जास्त लक्ष देता येत नाही, असे मला व्यक्तीशः वाटते.
प्रश्न ः सभापती म्हणून तुम्ही गेली साडेतीन वर्षे काम केले. तो अनुभव कसा होता?
तवडकर ः सभापतीपदाचा साडेतीन वर्षापूर्वी जेव्हा मी ताबा घेतला होता तेव्हाच सभापती म्हणून जी 356 दिवस काम करीन असे जाहीर केले होते. पण जेव्हा माझ्याकडे सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा सुरवातीला मी ते पद स्वीकारल्यास अनुत्सुक होतो. माझ्यावर अन्याय झाल्याची तेव्हा भावना होती. पण नंतर ती अन्यायाची भावना नाहीशी झाली आणि पद स्वीकारल्यानंतर मी आनंदाने काम करत त्या पदाची शान वाढवली. कुठलेही पद मिळाले की माणसाने त्या पदाचे सोने करावे, असे मला आता वाटते. सभापतीपदाचा अनुभव हा खूप चांगला होता. सभापती म्हणून काम करताना मी कुणावरही अन्याय होऊ दिला नाही. जी वागणूक सत्ताधारी सदस्यांना दिली तीच वागणूक विरोधी सदस्यांनाही दिली.
विधानसभा अधिवेशनाचे कामकाज हे कसे चालते, हे जास्तीत जास्त लोकांना पाहता यावे, अनुभवता यावे यास्तव, विधानसभा अधिवेशानाची द्वारे जास्तीत जास्त लोकांसाठी खुली केली. माझ्या सभपतीपदाच्या साडेतीन वर्षांच्या काळात तब्बल 15 हजार लोकांनी अधिवेशनाचे कामकाज कसे चालते ते प्रत्यक्ष विधानसभा अधिवेशनाच्या गॅलरीत राहून पाहिले. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश होता. ही गोष्ट खरी असली तरी मी शहरी लोकांबरोबरच मोठ्या संख्येने ग्रामीण भागांतील लोकांनाही विधानसभा प्रकल्पात येऊन अधिवेशन पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.