Home बातम्या मराठा आंदोलनास आणखी एक दिवसाची परवानगी

मराठा आंदोलनास आणखी एक दिवसाची परवानगी

0

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात उतरलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपली. मात्र त्यांना आज शनिवारी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मराठा आंदोलकांकडून काल दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आल्या आहेत. त्यातच, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा करुन 1 दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला. दुसरीकडे जरांगे पाटील यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमावलीचे पालन न केल्याने त्यांना तातडीने अटक करा, अशी मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

मराठा आंदोलकांनी काल केलेल्या वाहतूक कोंडीबाबत काही नियम व अटींच्या पार्श्वभूमीवरही त्यांना आज शनिवारी एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. आजच्या आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे जरांगे पाटील यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनास मुदतवाढीची परवानगी दिली असून आजचा प्रकार पाहता काही नियम व अटी त्यात असणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

वाहतूक कोंडी
जरांगे पाटलांच्या आंदोलनात नियमापेक्षा जास्त संख्येने मराठा बांधव उपस्थित होते, तर वाहतूक कोंडी होणार नाही याची हमी देऊनही वाहने रस्त्यात उभी करत वाहत कोंडी करण्यात आली. काही ठिकाणी जाणीवपूर्वक आंदोलक वाहने अडवून धरत होते. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ होईल या परिस्थितीनुसार आंदोलकांकडून पावले उचलली जात होती, या सर्व परिस्थितीकडे बोट दाखवत नियम व अटींच्या आधारे पोलिसांकडून पुढील मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.