मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचलपाठोपाठ उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पंजाब आदी राज्यांमधील जनजीवनही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात पुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. तसेच 96 पशुधन मृत्युमुखी पडले आहेत, तसेच सुमारे 495 घरे आणि 16 छोट्या पुलांचे नुकसान झाले आहे. येथील दंतेवाडा, विजापूर जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाने झोडपले, तर उत्तर प्रदेशात वाराणसी येथे गंगा नदीचे पाणी घाटांवर गेल्याने येथील आरती, अंत्यसंस्कारावर परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंजाबमधील पूरग्रस्त भागांत प्रशासनाच्या वतीने बचावकार्य केले जात आहे. प्रयागराजमध्ये गंगेची पाणी पातळी गुरुवारी सकाळी 70.262 मीटर इशारा चिन्ह ओलांडून 70.91 मीटरवर पोहोचली, 71.262 मीटर ही या नदीची धोका पातळी आहे. पुराच्या पाण्याने दशाश्वमेध घाट, हरिश्चंद्र आणि मणिकर्णिका घाटही पाण्याखाली गेले. वाढती पाण्याची पातळी आणि पुराची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.