Home बातम्या अधिवेशनातील उत्तरांवरूनच सरकारचा भ्रष्टाचार उघड

अधिवेशनातील उत्तरांवरूनच सरकारचा भ्रष्टाचार उघड

0

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांचा आरोप

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्या नेतृत्त्वाखालील गोवा सरकार हे अंत्योदय तत्त्वावर चालत असल्याचे सांगत आहेत. मात्र सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसच्या आमदारांनी सरकारला विचारलेले प्रश्न व त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेली उत्तरे पाहिल्यास हे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी वावरणारे सरकार नाही हे स्पष्ट होत असल्याचा आरोप काल गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेस आमदारांनी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळासंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर जे उत्तर देण्यात आले त्यावरून हे गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ हे बेकायदेशीररित्या जमिनींचे रूपांतर करून भ्रष्टाचार करण्यासाठीच स्थापन करण्यात आले असल्याचे स्पष्ट होत असल्याचे पाटकर यांनी सांगितले.
या मंडळातर्फे अडवलपाल येथे जो प्रकल्प आणण्यात आलेला आहे तो प्रकल्प ‘कमांड एरिया’ म्हणजेच जलसिंचनाची चांगली सोय करून शेतीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीत आणला आहे. त्यासाठी सुपीक कृषिक्षेत्रातील तब्बल 74 हजार चौ.मी. एवढी जमीन रूपांतरीत करून कारखान्यासाठी दिली असल्याचे पाटकर म्हणाले. हा प्रकल्प अत्यंत प्रदूषणकारी अशा ‘लाल’ वर्गातील असल्याचेही ते म्हणाले तेथे केवळ 14 स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळातर्फे गेल्या 5 वर्षांत मंजूर करण्यात आलेल्या 8 प्रकल्पांपैकी बहुतेक प्रकल्पांसाठी शेती, बागायती, वनक्षेत्र आदींचे रूपांतर करण्यात आले असल्याचे पाटकर म्हणाले.

राज्यातील अनुसूचित जमातींना जंगलातून त्यांच्या घरी जाण्यासाठी रस्ते तयार करून देण्यासही सरकारला पूर्ण अपयश आले असल्याचे काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला सरकारने दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाले असल्याचेही पाटकर यांनी म्हटले आहे. दक्षिण गोव्यात कर्करोग व मूत्रपिंड रोग झालेले किती रूग्ण आहेत असाही एक प्रश्न काँग्रेस आमदाराने विचारला हेता. त्या प्रश्नाचे आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेल्या उत्तरानुसार दक्षिण गोव्यात 23 साली कर्करोगाचे 331, 24 साली 261 व 2025 साली 278 एवढे रुग्ण होते. तर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने याच वर्षांत अनुक्रमे 943, 114, व 445 एवढे कर्करोगाचे रुग्ण असल्याचे म्हटले असल्याचे उत्तर देण्यात आले आहे. तर मूत्रपिंड रुग्णांसंबंधी दिलेली आकडेवारी अशीच असल्याचे पाटकर म्हणाले.