Home Featured प्रशासन स्तंभ व युनिटी मॉलला चिंबलच्या ग्रामसभेत तीव्र विरोध

प्रशासन स्तंभ व युनिटी मॉलला चिंबलच्या ग्रामसभेत तीव्र विरोध

0

चिंबल पंचायतीमध्ये काल रविवारी झालेल्या ग्रामसभेत चिंबल येथे होत असलेल्या राज्य सरकारच्या दोन मोठ्या प्रकल्पांना ग्रामस्थांकडून एकमुखाने विरोध करण्यात आला. त्यात चिंबल येथे राज्य सरकारच्या 15 मजली प्रशासन स्तंभ तसेच युनिटी मॉल या हस्तकलाकार व अन्य कलाकारांसाठीच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
वरील दोन्ही प्रकल्प हे राज्य सरकारचे मोठे प्रकल्प असून प्रशासन स्तंभ ही सरकारच्या सर्व खात्यांच्या कार्यालयांसाठीची प्रस्तावित इमारत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या अंदाजपत्रकातून प्रशासन स्तंभ उभारण्याची घोषणा केली होती. त्यावर तब्बल 300 कोटी रुपये एवढा खर्च करण्यात येत आहे. राज्य सरकारने पूर्वी ती जमीन आयटी प्रकल्पासाठी राखून ठेवली होती. मात्र त्या प्रकल्पाला विरोध झाल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून ती सरकारी जमीन वापराविना पडून राहिली होती.
युनिटी मॉल हाही एक मोठा प्रकल्प असून त्या मॉलला केंद्र सरकारकडूनही निधी उपलब्ध होणार आहे.

काणकोणात फिल्मसिटीला विरोध
लोलये ग्रामपंचायतीच्या काल रविवारच्या ग्रामसभेत गावातील पठारावर फिल्मसिटीसह अन्य वेगवेगळे 13 प्रकल्पांना जोरदार विरोध झाला. सदर जमीन कोमुनिदादची आहे. यावेळी सदर प्रकल्पासाठींची योजना रद्द करावी अशी सूचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी राज्यपालांना तसेच मुख्य सचिव, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, स्थानिक कोमुनिदाद तसेच पंचायतीने हस्तक्षेप करावा अशी मागणीही करण्यात आली.