1856 मीटर उंच स्फोट, हवाई क्षेत्र बंद
रशियातील कामचटका येथे 600 वर्षांत प्रथमच क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीचा उद्रेक झाला. कामचटका येथील आपत्कालीन मंत्रालयाने रविवारी सांगितले की, या ज्वालामुखीचा उद्रेक 2 ऑगस्ट रोजी झाला. 1856 मीटर उंच क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीमध्ये झालेल्या स्फोटानंतर राखेचे ढग 6 हजार मीटर उंचीपर्यंत पसरले. यामुळे या भागातील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले.
चार दिवसांपूर्वी रशियाच्या कामचटका बेटावर झालेल्या 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाशी हा स्फोट संबंधित असू शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. तत्पूर्वी, बुधवारी कामचटका द्वीपकल्पातील क्ल्युचेव्हस्काया सोपका ज्वालामुखीचाही उद्रेक झाला.
रशियाचा ज्या भागात हे दोन्ही ज्वालामुखी उद्रेक झाले, ते रिंग ऑफ फायरजवळ आहे. जगातील 90% भूकंप या रिंग ऑफ फायर क्षेत्रात होतात. रशियात झालेला भूकंप हा जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. यानंतर अनेक देशांनी त्सुनामीचा इशारा दिला होता.