Home Featured गरूडझेप

गरूडझेप

0

भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळातील अठरा दिवसांच्या ऐतिहासिक वास्तव्यानंतर काल सुखरूप पृथ्वीतलावर परतले. त्यांचे अंतराळयान ताशी अठ्ठावीस हजार किलोमीटरच्या वेगाने प्रवास करीत होते. म्हणजेच अंतराळातील अठरा दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी प्रत्येक दिवशी सोळा सूर्योदय आणि सोळा सूर्यास्त पाहिले आहेत. शेवटी तब्बल साडेबावीस तासांचा प्रवास करून काल त्यांचे अंतराळयान पृथ्वीवर परतले. त्यांचे सुखरूप पृथ्वीवर पुनरागमन हा एकशे चाळीस कोटी भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण तर आहेच, परंतु यापुढील भारतीय अंतराळमोहिमांसाठी देखील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. विशेषतः आणखी दोन वर्षांनी भारताची मानवासह अंतराळयान पाठविण्याची ‘गगनयान’ मोहीम गरूडझेप घेणार आहे. तिच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने शुभांशू शुक्ला यांनी गाठीस बांधलेला सध्याच्या अंतराळ मोहिमेचा अनुभव फार फार मोलाचा ठरणार आहे. चार दशकांपूर्वी विंग कमांडर राकेश शर्मा यांना भारताचा पहिला अंतराळवीर म्हणून अंतराळात पाऊल ठेवण्याची संधी प्राप्त झाली होती. ‘अंतराळातून भारत कसा दिसतो?’ ह्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या प्रश्नावर ‘सारे जहाँसे अच्छा’ असे फार सुंदर, समर्पक उत्तर राकेश शर्मा यांनी दिले होते, जे त्या पिढीतील प्रत्येक भारतीयाच्या काळजावर कोरले गेले आहे. त्या ऐतिहासिक घटनेपासून प्रेरणा घेऊन लढाऊ विमानांच्या वैमानिकापासून अंतराळयात्रीपदापर्यंत पोहोचलेल्या शुभांशू यांना केवळ अंतराळभ्रमणाचीच नव्हे, तर तेथे असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकामध्ये काही काळ वास्तव्य करण्याची संधी देखील प्राप्त झाली. अशी संधी मिळालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत. भारत आज केवळ ‘गगनयान’चेच स्वप्न पाहत नाही. त्या मोहिमेनंतर अंतराळामध्ये आपले स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याचाही मानस भारताने ठेवलेला आहे. सध्याचे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक आता जुने झाले आहे. अशाच प्रकारचे स्वतःचे अंतराळस्थानक अंतराळात असावे ह्या स्वप्नाने भारत भारलेला आहे. चीनही स्वतःचे अशाच प्रकारचे अंतराळस्थानक उभारण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे त्याच्याशी स्पर्धा करत सन 2035 पर्यंत भारत स्वतःचे असे हे ‘मेड इन इंडिया’ अंतराळ स्थानक उभारण्याचे स्वप्न पाहतो आहे. त्यामुळे त्यादृष्टीने देखील शुभांशू यांचा तेथील प्रत्यक्ष अनुभव मार्गदर्शक ठरेल. ज्या मोहिमेंतर्गत शुभांशू नासाची अंतराळवीर पेगी व्हिटसन हिच्या नेतृत्वाखाली गेले होते, त्यांनी 31 देशांसाठी विविध प्रकारचे साठ प्रयोग त्या वास्तव्यादरम्यान केले. त्यामध्ये भारताचे स्वतःचे सात प्रयोग होते. अंतराळातील वास्तव्याचा मानवी शरीरावर नेमका काय परिणाम होतो, इथपासून ते अंतराळात शेती करण्याच्या शक्यतांपर्यंत अनेक प्रयोगांतून महत्त्वपूर्ण अशी माहिती ह्या मोहिमेदरम्यान गोळा केली गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंतराळ संशोधनासंदर्भातील विविध प्रयोगांमध्ये योगदान देण्याची संधी भारताला ह्यामुळे प्राप्त झाली आहेच, शिवाय भारतीय वैज्ञानिक संस्थांमधून चाललेल्या विविध शास्त्रीय प्रयोगांना बळकटी देणारे ज्ञानही ह्या प्रयोगांतून निश्चितपणे प्राप्त झालेले असेल. शून्य गुरुत्वाकर्षणात वास्तव्य करून शुभांशू गुरुत्वाकर्षणयुक्त पृथ्वीवर परतले आहेत. त्यामुळे त्यांना पुढील दहा दिवस अनेक शारीरिक, मानसिक, वैद्यकीय तपासण्यांना, चाचण्यांना सामोरे जावे लागेल. आपल्या अंतराळभ्रमणादरम्यान सूक्ष्म गुरुत्वाकर्षणासंदर्भातील काही प्रयोगही शुक्ला यांनी केले आहेत. त्या आणि इतर शास्त्रीय प्रयोगांतून मिळालेल्या सगळ्या तपशिलाचे विश्लेषण करून भविष्यातील अंतराळ मोहिमांना त्याचा कसा लाभ देता येईल याचा विचार यापुढे सुरू होईल. सन 2027 मध्ये मानवी अंतराळवीरांसहीत भारताचे ‘गगनयान’ अवकाशात झेपावणार आहे. आजपर्यंत ‘चंद्रयान’, ‘मंगलयान’ द्वारे आपल्या ‘इस्रो’ने अनेक मैलाचे दगड पार केले, परंतु मानवाला अंतराळात पाठविणे हे आपले नेहमीच स्वप्न राहिले आहे. केवळ अंतराळात आपले अंतराळवीर पाठवणे किंवा स्वतःचे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक उभारणे एवढेच नव्हे, तर त्याही पुढे जाऊन उद्या प्रत्यक्ष चंद्रावर भारतीय अंतराळवीराला आपल्या स्वतःच्या अंतराळयानातून पावले टेकवता यावीत असे स्वप्नही भारत पाहतो आहे. त्यामुळे ह्या मोहिमांच्या पूर्वतयारीसाठी अंतराळवीरांना प्रशिक्षित करण्यापासून त्यासाठीच्या साऱ्या योग्य साधनसामुग्रीची जुळवाजुळव करण्यापर्यंतच्या कामांचे नेतृत्व यापुढे शुभम शुक्ला करू शकतील. ‘इस्रो’च्या आगामी महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना शुक्ला यांच्या प्रत्यक्षानुभवाचे बहुमोल साह्य होईल आणि त्यातून भारतीय अंतराळ मोहिमा मोठी गरूडझेप घेतील अशी अपेक्षा करूया.