Home Featured मायकल लोबोंसह मुख्यमंत्री भेटले अमित शहांना

मायकल लोबोंसह मुख्यमंत्री भेटले अमित शहांना

0

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची उपस्थिती होती. गोव्यातील महत्त्वपूर्ण विकासकामे आणि राज्यातील राजकीय विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी भेटीनंतर दिली.
राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा सुरू असताना मायकल लोबो यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने तो राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. मायकल लोबो किंवा त्यांची पत्नी डिलायला लोबो यांच्यापैकी एकाची राज्य मंत्रिमंडळाच्या फेररचनेच्या वेळी मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मधल्या काळात काही कार्यक्रमांदरम्यान मुख्यमंत्र्यांनी मायकल लोबोंना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचेही म्हटले होते.


मुख्यमंत्री भेटले आलेक्स सिक्वेरांना
या दिल्ली दौऱ्यादरम्यान काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. मंत्री सिक्वेरा गेले काही दिवस नवी दिल्ली येथे उपचार घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी सुमारे चर्चा दीड तास चर्चा केली. आपले मंत्रिपद ठेवणे किंवा काढून टाकणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असे आलेक्स सिक्वेरा यांनी म्हटले आहे. आमच्या चर्चेत कोणताही राजकीय मुद्दा नव्हता. आपण पुढील आठवड्यात गोव्यात येणार आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होणार आहे, असेही सिक्वेरा यांनी म्हटले आहे.


मुख्यमंत्र्यांकडून
केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी

याशिवाय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सकाळी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य तथा उद्योगमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. गोव्यात ‘आपेडा’ कार्यालय सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पियुष गोयल यांच्याकडे केली. त्याचबरोबर राज्यातील उद्योजकांच्या काही मागण्याही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या.
विश्वजीत राणे देखील दिल्लीत
मंत्री विश्वजीत राणे यांनी देखील दिल्लीकडे प्रयाण केल्याने तो देखील राजकीय चर्चेचा विषय बनला. दरम्यान, राणे यांनी काल आपल्या दिल्ली दौऱ्याविषयी बोलताना आपली दिल्लीवारी ही आपल्या वन खात्याच्या कामासंबंधी असल्याचे स्पष्ट केले.