वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची पत्रत्रकार परिषदेत माहिती
वीज खात्यातील लाइनमनची सुरक्षा वाढविण्यासाठी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने (जीईसी) विकसित केलेले स्मार्ट हेल्मेट आणि स्मार्ट घड्याळ या सुरक्षा उपकरणांची लवकरच खरेदी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात किमान 100 स्मार्ट हेल्मेट आणि स्मार्ट घड्याळांची खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
जीईसीने तयार केलेले स्मार्ट हेल्मेट आणि स्मार्ट घड्याळाचा शुभारंभ गतवर्षी करण्यात आलेला आहे. ही दोन्ही उपकरणे जिवंत तारा आणि संभाव्य विद्युत धोके शोधण्यासाठी डिझाइन केलेली आहेत, ज्याचा उद्देश फील्डवर्क दरम्यान अपघात रोखणे आहे, असेही वीजमंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
होंडातील दुर्घटनेचा अहवाल लवकरच
होंडा येथे वीज खांबांवरील दुर्घटनेबाबत अहवाल तयार झाला असून मुख्य वीज अभियंत्याकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तो अहवाल आपणाला मिळेल, असेही मंत्री ढवळीकर यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. गेल्या 20 मे रोजी होंडा येथे ट्रान्सफॉर्मरवर दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का बसल्याने मोर्ले सत्तरी येथील लाइनमन चंद्रू गावकर यांचा मृत्यू झाला आहे.