Home बातम्या पाकिस्तानवर विश्वास ठेवणे कठीण

पाकिस्तानवर विश्वास ठेवणे कठीण

0

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

ऑपरेशन सिंदूर ही दहशतवादाविरोधातील कारवाई

ज्या देशात ओसामा बिन लादेनसारख्या दहशतवाद्याला अनेक वर्षे लष्करी क्षेत्रात लपून ठेवण्यात आले होते, त्या देशावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईला केवळ भारत-पाकिस्तान सीमा वाद म्हणून न पाहता, दहशतवादाविरुद्ध भारताची कारवाई म्हणून पाहण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना केले आहे.

जयशंकर या आठवड्यात युरोपीय देशांच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी ते बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये होते. येथे त्यांनी युरोपीय संघाच्या नेत्यांची भेट घेतली. युरोपीय वृत्तसंस्था ‘युराॲक्टिव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर यांनी अमेरिका, चीन, पाकिस्तान, रशिया-युक्रेन युद्ध आणि भारताचे युरोपीय संघाशी असलेले संबंध याबद्दल सविस्तर चर्चा केली.

जयशंकर यांनी युरोपीय माध्यमांना सांगितले की, दहशतवाद ही केवळ एका देशाची किंवा प्रदेशाची समस्या नाही. तो एक जागतिक धोका आहे, जो लवकरच सर्वांना प्रभावित करेल. यावेळी जयशंकर यांनी, खरा मुद्दा दहशतवाद हा असताना आंतरराष्ट्रीय माध्यमे अनेक वेळा भारताच्या कृतीला ‘सूड’ म्हणून सादर करतात याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आता जग बहुध्रुवीय होत चालले आहे आणि युरोपलाही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतील आणि फक्त अमेरिका किंवा इतर देशांकडे पाहू नये. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी सुरू आहेत. भारताला रशिया आणि चीनवरील आपले अत्यधिक अवलंबित्व कमी करायचे आहे. युद्धाद्वारे समस्या सुटू शकत नाहीत
रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताच्या भूमिकेबाबत जयशंकर यांनी पुनरुच्चार केला की भारत युद्धाद्वारे तोडगा काढण्यावर विश्वास ठेवत नाही. भारताचा असा विश्वास आहे की मतभेद शस्त्रांनी नव्हे तर संवादाने सोडवले पाहिजेत. त्यांनी स्पष्ट केले की भारत या युद्धाचा भाग नाही आणि भारताने काय करावे हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही असे पुढे बोलताना जयशंकर यांनी स्पष्ट केले.