2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणा याचे गुरुवारी अमेरिकेकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. तहव्वूर राणाला एका विशेष विमानाने दिल्लीच्या पालम विमानतळावर आणल्यानंतर एनआयएने त्याला औपचारिकपणे अटक केली. गुरुवारी रात्री तहव्वूर राणाला दिल्लीच्या विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाकडे एनआयएने 20 दिवसांची कोठडी मागितली होती; परंतु न्यायालयाने एनआयएला राणाची 18 दिवसांची कोठडी दिली.
तत्पूर्वी, विमान भारतात उतरल्यानंतर, तहव्वूर राणा याला कडक सुरक्षेत विमानतळावरून पटियाला हाऊस न्यायालयात आणण्यात आले. त्याला विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजीत सिंह यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. विशेष न्यायालयात एनआयएचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ वकील दयान कृष्णन आणि विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांनी केले. त्याच वेळी, दिल्ली कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील पीयूष सचदेवा यांनी तहव्वूर राणाची बाजू न्यायालयात मांडली. न्यायाधीशांना संपूर्ण प्रकरणाची आणि वैद्यकीय अहवालाची माहिती देण्यात आली. सुनावणीनंतर 18 दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याने आता एनआयए मुख्यालयात चौकशी केली जाणार आहे. एनआयए मुख्यालयात एक चौकशी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात तपासाशी संबंधित फक्त 12 सदस्यांना प्रवेश असणार आहे.