राजभाषा संचालनालयाने आरोग्य केंद्र आणि इस्पितळांमध्ये नामफलक मराठी भाषेत लावण्याचा आदेश आरोग्य सेवा संचालनालयाला दिला आहे.
राजभाषा कायद्यांतर्गत सरकारी खात्यांना मराठी भाषेत नामफलक लावणे बंधनकारक आहे. राजभाषा संचालनालयाने याबाबत एक परिपत्रक सुध्दा जारी केले आहे. तथापि, काही सरकारी खात्यांकडून राजभाषा संचालनालयाच्या परिपत्रकांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारच्या मये आरोग्य केंद्र व इतर आरोग्य सेवा विभागामध्ये नामफलक मराठी भाषेत लावण्यात आलेले नाहीत, अशी तक्रार ‘मराठी असे आमुची मायबोली’ यांच्यातर्फे राजभाषा संचालकांकडे करण्यात आली होती. त्याला अनुसरून राजभाषा संचालनालयाने आरोग्य संचालनालयाला पत्र पाठवून अनुपालन अहवाल पाठविण्याची सूचना केली आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा इस्पितळांनी राजभाषा संचालनालयातर्फे जारी केलेल्या परिपत्रकानुसार नामफलक लावलेले नाहीत. राजभाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार नामफलक लावले आहेत की नाही याबाबत अनुपालन अहवाल पाठवावा, असे राजभाषा संचालक प्रशांत शिरोडकर यांनी आरोग्य संचालनालयाला पाठविलेल्या पत्रात
नमूद केले आहे.