तीन भाषांसह चार कौशल्य विषयांचा समावेश
राज्यात 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना दहा विषय लागू होत आहेत. त्यात 3 भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र याविषयाबरोबर चार कौशल्य विषयांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी काल दिली.
सहा विषयांची परीक्षा
यंदापासून दहावीच्या दहापैकी सहा विषयांची परीक्षा मंडळाकडून घेतली जाणार आहे. तर, चार कौशल्य विषयाची परीक्षा आणि उत्तरपत्रिकांची तपासणी संबंधित विद्यालयाकडून केली जाणार आहे. मंडळाकडून गरज भासल्यास या विषयांची प्रश्नपत्रिका पाठविली जाऊ शकते. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये एकूण 10 विषयांचा समावेश केला जाणार आहे, असेही मंडळाचे अध्यक्ष शेट्ये यांनी सांगितले.
या चार कौशल्य विषयामध्ये आंतरशिस्त क्षेत्र शिक्षण (आयडीए), कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण यांचा समावेश आहे. या चार विषयांपैकी दोन विषयांत विद्यार्थ्याला 65 टक्के आणि दोन विषयांत 50 टक्के एवढे गुण मिळाले आणि मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या सहा विषयांच्या परीक्षेत विद्यार्थी दोन विषयात अनुत्तीर्ण झाला तरी तो उत्तीर्ण होऊ शकतो. या योजनेला भरपाई योजना असे संबोधले जाते, असेही शेट्ये यांनी सांगितले.
राज्यात प्रथमच एप्रिलपासून
नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ
राज्यात 2025-26 या नवीन शैक्षणिक वर्षाला कालपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या नवीन शैक्षणिक वर्षात एप्रिल महिन्यात सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग घेतले जात आहेत. एप्रिल महिन्यात सकाळी 11.30 पर्यंत वर्ग घेतले जाणार आहेत.
राज्यात प्रथमच एप्रिल महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. एप्रिल महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी काही जणांनी विरोध करून न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, न्यायालयाने सरकारची बाजू उचलून धरल्याने अखेर एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे.
पर्वरीत निदर्शने
सिसील रॉड्रीगीस यांनी काही पालकांसमवेत पर्वरी येथे शिक्षण खात्याच्या कार्यालयाजवळ एप्रिलमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केल्याबद्दल निदर्शने केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एप्रिल महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. तरीही, काहीजणांकडून नवीन शैक्षणिक वर्षाला विरोध केला जातो. विद्यार्थ्यांचे हित नजरेसमोर ठेवून एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.