Home Featured नव्या शैक्षणिक वर्षाचा आजपासून ‘श्रीगणेशा’

नव्या शैक्षणिक वर्षाचा आजपासून ‘श्रीगणेशा’

0

वर्षभरात 1200 शैक्षणिक तास पूर्ण करण्याचे शिक्षण खात्याचे उद्दिष्ट

राज्यात आजपासून (दि. 7) नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. आजपासून सहावी ते दहावी आणि बारावी इयत्तेचे वर्ग सुरू होणार असून, प्राथमिक शाळांचे पहिली ते पाचवी इयत्तेपर्यंतचे वर्ग जून महिन्यापासून सुरू होणार आहेत. 7 एप्रिलपासून सुरू करण्याच्या गोवा सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावल्याने सहावी ते बारावी इयत्तेपर्यंतचे (अकरावी वगळून) वर्ग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यंदापासून उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर काही पालकांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवित उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मान्युएल सिडनी आंताव, रुपेश शिंक्रे व अन्य सात पालकांनी याविषयी न्यायालयात याचिका सादर केल्या होत्या. मात्र, न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यंदापासून एप्रिल महिन्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार वर्षभरात 1200 सूचनात्मक तास पूर्ण होणे आवश्यक आहे. मागील वर्षी हे तास 1045 एवढे होते. या पार्श्वभूमीवर 150 अतिरिक्त तास भरून काढावे लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने एप्रिल महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असले, तरी 8 वाजता सुरू होणारे वर्ग 11.30 वाजेपर्यंतच चालू राहणार आहेत. 7 एप्रिलपासून सुरू होणारे वर्ग 30 एप्रिलपर्यंत चालू राहणार आहेत. नंतर संपूर्ण मे महिन्यात उन्हाळ्याची सुट्टी असेल व नंतर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा शाळा सुरू होणार आहेत.