गोवा दौऱ्यावर असलेले काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना 2027 साली राज्यात होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाचा विजय होऊन काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सध्या सत्तेवर असलेले भाजप सरकार हे भ्रष्टाचारी असून, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थाही ढासळली असल्याचा आरोप ठाकरे यांनी काल केला. राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे भू रूपांतरे चालू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्यात चांगली आरोग्य सेवाही उपलब्ध नसून, साधनसुविधांचाही विस्तार होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजपच्या राजवटीत गोव्याची अस्मिता नष्ट होण्याची भीती व्यक्त करतानाच काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर सर्व क्षेत्रात विकास व सुधारणा घडवून आणण्याबरोबरच राज्याची अस्मिता जपण्यासाठी काम करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
ठाकरे यांनी काल राज्यातील विविध मतदारसंघांचा दौरा केला. विशेष करून काँग्रेस पक्षांतून फुटून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघांचा त्यांनी दौरा केला. या मतदारसांतील संघटना बळकट करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. फुटीर आमदारांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.