गोवा प्रदेश महिला काँग्रेसने नारी न्याय आंदोलना अंतर्गत काल पणजीतील काँग्रेस मुख्यालय ते आझाद मैदान दरम्यान मोर्चा काढून महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी केली. महिलांचे हक्क, महिलांविरोधात वाढते गुन्हे, महिला आरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी देखील करण्यात आली. काँग्रेसच्या महिला विभागाकडून देशभरात नारी न्याय आंदोलन केले जात आहे. काँग्रेस पक्ष महिलांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहे. महिलांचे हक्क व प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असून, फक्त महिलांचा एकगठ्ठा मतांसाठी वापर केला जात आहे, अशी टीका गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांनी केला.
गोव्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या वर्षी जवळपास 367 प्रकरणे नोंदविली गेली आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून गोव्यात महिला सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. या वर्षीच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात महिलांवरील अत्याचाराची 63 प्रकरणे नोंद झाली आहेत, असेही डॉ. प्रतीक्षा खलप यांनी निदर्शनास आणून दिले.
महिलांसाठी 33 टक्के आरक्षण आहे. गोवा विधानसभेच्या 2027 च्या निवडणुकीसाठी महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी जनगणना आणि सीमांकन लवकरात लवकर करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली. यावेळी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस लिबेराटा मदेरा, ॲड. लव्हिनिया दा कॉस्ता यांनी विचार मांडले.

