मडकईकरांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करा ः काँग्रेस

0
6

माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला 15 ते 29 लाख रुपयांची लाच दिल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारच्या दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विभागाकडे दोन तक्रारी काल दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना एक पत्र पाठवून या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

माजी मंत्री मडकईकर यांनी लाच प्रकरणात एका मंत्र्यावर केलेला आरोप गंभीर आहे. या आरोपाबाबत सरकारकडून कोणतीही कृती केली जात नसल्याने या प्रकरणी तपासासाठी भ्रष्टाचार विभागाकडे तक्रार केली आहे, असे एक तक्रारदार सुदिप ताम्हणकर यांनी सांगितले.

कथित लाच प्रकरणामध्ये काही जागरूक नागरिकांनी भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे काशीनाथ शेट्ये व इतर सहाजणांनी तक्रार केली आहे. लाचप्रकरणी आरोप करणाऱ्या मडकईकर यांची प्रथम चौकशी करावी. त्यानंतर सर्व मंत्र्यांची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी निवृत्त सरकारी अधिकारी जॉन नाझारेथ यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

माजी मंत्री मडकईकर यांनी सरकारमधील मंत्र्यावर लाच प्रकरणात केलेला आरोप गंभीर असून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
भारतीय न्याय संहिता 2023 व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या आधारे राज्यपालांनी हस्तक्षेप करून सरकारला चौकशीचे आदेश द्यावेत. निष्पक्ष चौकशीसाठी सीबीआयतर्फे चौकशी होणे योग्य ठरणार आहे. लोकशाहीत भ्रष्टाचाराला थारा असता कामा नये. यासाठी आरोपांची चौकशी व्हायला हवी, असे कवठणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

खासगी सचिवामार्फत सरकारमधील एका मंत्र्याला 15 ते 20 लाख रुपये लाच दिल्याचा आरोप माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मंगळवारी केला होता. मडकईकर यांनी केलेल्या या आरोपामुळे सर्व मंत्र्यांकडे संशयाचे नजरेने पाहिले जात आहे.