बी. एल. संतोष यांच्या आगामी दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा ऊत

0
3

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे. दरम्यान, राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हे गोवा प्रदेश भाजपच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी येत आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल दिली.

भाजपचे केंद्रीय नेते गोवा दौऱ्यावर आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर जोरदार चर्चा सुरू होते. काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही आमदारांना दिलेल्या वचनांची अजूनपर्यंत पूर्तता झालेली नाही. त्या आमदारांकडून वचनपूर्तीसाठी केंद्रीय पातळीवर सातत्याने प्रयत्न केला जात आहे.
गोवा भाजपच्या नूतन प्रदेशाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे. तथापि, राज्य कार्यकारी समितीची अजून घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपच्या राज्य कार्यकारी समितीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बी. एल. संतोष गोव्यात येत आहेत.
प्रदेश भाजपची नव्या कार्यकारी समितीची घोषणा केली जाणार आहे. तसेच, विविध समित्यांची फेररचना करण्यात येणार आहे. या विषयावर बी. एल. संतोष चर्चा करणार आहे, असे दामू नाईक यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या विषयावर केंद्रीय पातळीवर अजूनही कोणतीही चर्चा सुरू नाही. त्यामुळे बी. एल. संतोष त्याबाबत आमच्यासोबत चर्चा करणार की नाही, ते अजून स्पष्ट नाही, असेही नाईक यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काही महिन्यापूर्वी मंत्रिमंडळ फेरबदलास दुजोरा दिला होता. पण, नंतर त्यांनीच राज्य मंत्रिमंडळात तूर्त बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दामू नाईक यांनीही मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत काही ठोस माहिती दिलेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.