राज्यातील धार्मिक सलोख्याला सुरूंग लावून नव्या सरकारवर त्याचे बालंट आणण्यासाठी काही समाजविघातक शक्ती पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे देवदेवतांच्या मूर्तींची तोडफोड करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामागे कोण होते हे अजूनही उजेडात आलेले नसल्याने आता पुन्हा एकदा नवे सरकार सत्तारूढ होताक्षणी धार्मिक स्थळांची नासधूस करण्यास सुरूवात झालेली आहे. यावेळी ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येते. म्हापशातील क्रॉसची मोडतोड झाली, कुडचड्यातील ख्रिस्ती दफनभूमीत व मुसलमानांच्या कब्रस्थानात तोडफोड केली गेली. असे आणखी प्रकारही होण्याची शक्यता आहे. गोव्याचे वैशिष्ट्य असलेल्या धार्मिक सलोख्याला सुरूंग लावून येथे बहुसंख्यक हिंदू आणि अल्पसंख्यक ख्रिस्ती व मुसलमान बांधवांमध्ये कलह लावून देण्याचे अत्यंद दुष्ट मनसुबे या घटनांमागे असल्याचे स्पष्टपणे दिसते. यावेळी या घटकांना केवळ धार्मिक अंग नाही, तर राजकीय अंगही असावे. नवे सरकार सत्तारूढ होताच या घटना सुरू झाल्या याला काही विशेष अर्थ आहे.
नव्या भाजपा – मगो सरकारमध्ये येथील अल्पसंख्यक सुरक्षित नाहीत अशा प्रकारचे विपर्यस्त व खोटारडे चित्र देशात निर्माण करण्याचा हा डाव आहे. उद्या या अशा घटनांचे निमित्त करून विद्यमान सरकारविरुद्ध वातावरण कलुषित करण्यासाठी काही साळसूद म्होरके पुढे होतील. त्यांचा हा कावा गोमंतकीय जनतेने ओळखणे आवश्यक आहे. गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात दंगलींच्या दशकपूर्तीचे निमित्त करून जुनी मढी उकरून काढून त्यावरून वातावरण तापवण्याचा पद्धतशीर प्रयत्न काही वृत्तवाहिन्यांनी केला होता. अर्थात जनतेच्या समंजसपणामुळे तो काही तडीला गेला नाही ही बाब वेगळी, परंतु अशा कलह माजवून त्यावर स्वार्थाची पोळी भाजू पाहणार्या शक्ती सदैव पडद्यामागून वावरत असतात हे जनतेने लक्षात घेणे आवश्यक आहे. गोव्यातील या घटनांमागे कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करणे हे जसे शासनाचे कर्तव्य आहे, तसेच ते येथील परंपरागत धार्मिक सलोखा आणि बंधुभाव टिकावा असे प्रामाणिकपणे वाटणार्या येथील आम जनतेचेही कर्तव्य ठरते. सरकारला तपासकामामध्ये जनतेचे जर सहकार्य मिळाले, तर अल्पावधीत हे गुन्हेगार गजाआड झाल्याखेरीज राहणार नाहीत. धर्म ही आपल्या देशात अत्यंत संवेदनशील अशी बाब आहे आणि दंगलींचा भडका उडण्यास एखादी काडीही पुरेशी ठरते हा इतिहास असल्याने धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या दुष्ट हेतूने कोणीतरी हे उपद्व्याप सुरू केलेले आहेत. कुडचड्याची निवड या घटनांसाठी केली गेली त्याचा अर्थही स्पष्ट आहे. काही वर्षांपूर्वी गुड्डेमळ – कुडचडे येथे उसळलेली दंगल लक्षात घेऊन त्या परिसराची निवड केली गेलेली असू शकते. या कृत्याचा कुडचडेवासीयांशी कोणताही संंबंध नाही व कोणत्या तरी बाहेरच्या समाजविघातक शक्तींनीच हे षड्यंत्र रचलेले आहे, हे अल्पसंख्यक बांधवांनीही याक्षणी समजून घेणे आवश्यक आहे. कब्रस्थान वा दफनभूमीमध्ये तोडफोड करणे हे तर अत्यंत नीचपणाचे कृत्य आहे आणि त्यामागे जे कोणी असतील त्यांना कठोर शासन होणे आवश्यक आहे. पर्रीकर यांचे संवेदनशील सरकार गुन्हेगारांना शासन घडवील याविषयी जनतेच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. काल तातडीने पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून सरकारने या घटनांची गांभीर्याने दखल घेतली गेल्याचे दाखवून दिले आहे. याच गांभीर्याने पोलिसांकडून तपासकाम होईल आणि लवकरात लवकर या उचापती कोणाच्या ते जनतेसमोर येईल अशी आशा आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाकच गेल्या काही वर्षांमध्ये राहिलेला नाही. तो पुन्हा निर्माण झाला पाहिजे. असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसी गस्त वाढवणे, सर्वधर्मिय देखरेख समित्या स्थापन करणे, संवेदनशील भागांमध्ये बुजुर्ग नागरिकांच्या शांतता समित्या स्थापन करणे आदींद्वारे धार्मिक तणाव कोणत्याही कारणाने वाढू नये याची दक्षता आता सरकारला घ्यावी लागेल. या गुन्हेगारांना असे शासन व्हावे की पुन्हा राज्यामध्ये धार्मिक स्थळांना हात लावण्यास आणि सामाजिक सलोख्याला सुरूंग लावण्यास कोणी धजावू नये.