– शि. कृ. रिवणकर बांदिवडे बंदर, फोंडा
माननीय मनोहर पर्रीकरांना गोव्याच्या जनतेने निर्विवाद बहुमत दिले असून त्यांच्या सरकारला ५ वर्षेपर्यंत स्थिर केले आहे, याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. पर्रीकरांनी मागील सत्तेच्या काळात अनेक पूल अल्पावधीत बांधल्याचे मी दैनिकांमध्ये अनेकदा लिहिले होते. त्या सत्यानुभवानुसार ते यावेळीही पूल बांधतील अशी अपेक्षा आहे. शिवाय कारोणा – कालवी, पणजी – बेती, मळा-पाटो कॉम्प्लॅक्स इत्यादी ठिकाणी पूल बांधण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांची आश्वासने त्यांनी पाळल्याचे मागे पाहिले असल्याने हे पूल पूर्ण होतील, हे निश्चित आहे.
गोव्यात अनेक पुलांची तातडीची आवश्यकता आहे. विशेषतः तिसवाडी तालुका म्हणजे अनेक बेटांचा समूह आहे. ही बेटे सुद्धा पुलांनी एकमेकांना जोडणे गरजेचे आहे. विशेषतः वाढत्या वाहनांच्या रहदारीमुळे इतर जवळच्या रस्त्यांची गरज आहे.
गोवा मुक्त होऊन ५० वर्षे झाली. म. गो. नि कॉंग्रेसने राज्यकारभार चालवला (अल्पकाळी भाजपकडे सत्ता आली नि अनेक पूल बांधले, हे अनुभवास आले.) कॉंग्रेसचे धोरण वेगळे होते. बांधकामाच्या नावाखाली कामे पूर्ण न करता अडवून ठेवणे, ठेकदारांना प्रथम मोबिलायझेशन ऍडव्हान्स देणे, बांधकाम साहित्य पुरविणे, त्याचा हिशेब न ठेवता इथे-तिथे टाकून दिले जाते, काम पूर्ण न करता लोंबकळत ठेवणे, एस्कलेशननुसार बांधकामाचे जादा पैसे देणे, अखेरीस मध्यस्थाची नेमणूक करणे, हे मध्यस्थ अभियंते सरकारला दोषी ठरवून ठेकेदारांना नुकसानभरपाई द्यायचे. ठेकेदारांकडून टक्केवारीसुद्धा गोळा केली जायची, असे ऐकतो. ते सत्य की काय हे माहीत नाही, परंतु त्यांच्या काळी मोठ्या प्रमाणात पुलांचे बांधकाम झाले नाही, हे सत्य आहे. एवढेच काय चर्चिल आलेमाव यांनीआपल्या बाणावली मतदारसंघातील दोन पूल अजूनपर्यंत पूर्ण केले नाहीत. गवंडाळीचा पूल अजून रखडलेला आहे.
रवी नाईक यांनी मडकईला सर्वेक्षण करून सुद्धा अजून पूल बांधला गेला नाही. बांदिवडे गांवातील कोनार-गावणे ते उंडीर येथील पुलाचे काम अर्धवट आहे.
भाजपाचे श्री. महादेव नाईक शिरोड्याला पूल बांधण्याच्या प्रयत्नात होते. रायतूर-शिरोडा पूल बांधता येत नसल्यास काराय-शिरोडा ते जुवें पूल बांधावा. बोरी टोलनाकापासून जुवेपर्यंत खाजनातून रस्ता करावा. शेकडो वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी रायबंदर -पाटो ते पणजी रस्ता केला होता. श्री. पर्रीकरांनी चिंबल-रायबंदर ते पणजी हायवेपर्यंत कदंबाला जोडणारा रस्ता केला होता, तसा रस्ता तेथे करावा.
श्री. श्रीपाद नाईक यांनी आडपई ते रासईमार्गे वेर्णे येथे जाण्याकरिता पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. आलेमांवानी दिवाडी ते बांयगिणे / रायबंदर पूल बांधण्याचे वचन दिले होते. रायबंदरच्या फेरीला खूप गर्दी असते. पणजीला फेरीबोटीच्या फाळक्यावर लोक उभी राहतात, वाहने ठेवतात, एवढी धोकादायक गर्दी असते. भाजपने सर्वप्रथम ह्या पुलांचे काम हाती घ्यावे, अपूर्ण पूल पूर्ण करावेत, नवीन पूल लवकर बांधावेत.