8-10 दिवसांत कला अकादमीचा ताबा मिळणार

0
16

>> मंत्री गोविंद गावडेंची माहिती; साबांखाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतला कामाचा आढावा

कोट्यवधी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आलेली कला अकादमी विविध कारणांमुळे चर्चेचा विषय बनलेली आहे. या पार्श्वभूमीवर, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेऊन कला अकादमीच्या कामाचा आढावा काल घेतला. कला अकादमीचे काम अपूर्णावस्थेत असून येत्या आठ ते दहा दिवसांत ते पूर्ण झाल्यानंतर कला अकादमीच्या इमारतीचा ताबा कला अकादमीच्या प्रशासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे. कला अकादमीतील ध्वनियंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे, असे गोविंद गावडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सध्या कला अकादमीचा पूर्ण ताबा देण्यात आलेला नाही. असे पत्र पीडब्ल्यूडीने दिले आहे. त्यानुसार सभागृहासाठी अकादमीत नोंदणी सुरू आहे; पण सगळे काम पूर्ण झाल्यानंतरच अकादमीचा ताबा आम्हाला द्यावा, असे पत्र पीडब्ल्यूडीला पाठवले आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.

अकादमीच्या छतावर पाने साचल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊ शकला नाही. त्यामुळे अकादमीतील छताचा भाग कोसळला. आगामी पावसाळ्यात असा प्रकार होऊ नये म्हणून उपाययोजना केली जात आहे, असेही गावडे यांनी सांगितले.