पुन्हा पुतीन

0
23

युक्रेनच्या सामीलीकरणासाठी गेली दोन वर्षे लष्करी मोहीम राबवूनही यश पदरात न पडलेल्या व्लादिमीर पुतीन यांच्याकडे पुन्हा एकवार जनतेने रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली आहेत. अर्थात, रशियामधील एकूण हुकूमशाही राजवट लक्षात घेता, झालेली निवडणूक ही किती वस्तुनिष्ठपणे झाली असेल शंकाच आहे. ह्या ऑनलाइन निवडणुकीसाठीचे मतदान तीन दिवस चालले होते आणि युक्रेनच्या बळकावलेल्या भागामध्ये तर मतदानासाठी आणखी अवधी देण्यात आला होता. ह्या सगळ्या खटाटोपाच्या अखेरीस पुतीन महाशयांनी आपल्याला रशियाच्या जनतेने एकमुखी कौल दिल्याची घोषणा करून टाकली आहे. पुतीन यांना तब्बल 87 टक्के जनतेने कौल दिल्याचे घोषित झाले आहे, त्यामुळे ते रशियाचे पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत आणि आणखी सहा वर्षे त्यावर सत्ता चालवणार आहेत. त्यांनी ही कारकीर्द पूर्ण केली तर अठराव्या शतकातील कॅथरिन द ग्रेटनंतरचे ते सर्वांत जास्त काळ सत्तेत राहिलेले नेते ठरतील. जोसेफ स्टालीनपेक्षाही अधिक काळ सत्ता भूषवणाऱ्या पुतीन यांच्या विरोधात उभे राहिलेले तिन्ही उमेदवार किरकोळ होते व सत्ताधारी राजवटीचेच जणू रबरस्टँप होते, त्यामुळे पुतीन विजयी होणे हे अपेक्षितच होते. परंतु सत्तेवर आल्या आल्या त्यांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जे वक्तव्य केलेले आहे ते केवळ रशिया आणि युक्रेनसाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी चिंता उत्पन्न करणारे आहे. नाटो फौजांनी युक्रेनमध्ये पाऊल टाकले तर तिसरे महायुद्ध अटळ असेल असा त्यांच्या वक्तव्याचा गर्भितार्थ आहे. फ्रान्सचे प्रमुख इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अलीकडेच रशियाच्या युक्रेनवरील कब्जाच्या प्रयत्नांचा निषेध करताना गरज भासल्यास युक्रेनमध्ये नाटो फौजा घुसवण्याचे वक्तव्य केले होते, त्याचा संदर्भ पुतीन यांच्या या धमकीला आहे. पूर्ण क्षमतेच्या तिसऱ्या जागतिक महायुद्धापासून आपण केवळ एक पाऊल दूर आहोत असे पुतीन म्हणत आहेत हा त्यांच्या युद्धखोरीचा नवा अध्याय म्हणावा लागेल. पुतीन यांची आजवरची कारकीर्द आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमागची मनोभूमिका लक्षात घेता ही धमकी जगाला गांभीर्यानेच घ्यावी लागेल. बोरीस येल्त्सिन यांच्या अखेरच्या आजारपणानंतर पुतीन यांच्याकडे रशियाची धुरा ह्या एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी आली. सुरवातीला लिबरल डेमोक्रॅटिक अशी त्यांची प्रतिमा होती, परंतु बघता बघता ती ऑटोक्रॅटिक म्हणजे हुकूमशहाची केव्हा बनली हे कदाचित त्यांनाही कळले नसेल. ते रशियाच्या सत्तेवर आले तेव्हा चेचेन बंडखोरांनी धुमाकूळ घातला होता. बॉम्बस्फोट मालिका होत होत्या. रशियाची अर्थव्यवस्थाही डळमळीत झाली होती. पुतीन यांनी चेचेन बंडखोरांबाबत कठोर भूमिका घेतली आणि चेचेन्यावर निर्णायक विजय मिळवून तो विषयच संपवून टाकला. एकदा ह्या चेचेन बंडखोरांनी एका कार्यक्रमावेळी एक हजार जणांना ओलीस धरले तेव्हा दयामाया, विवेक न दाखवता पुतीन यांनी धडक कारवाईचे आदेश दिल्याने साडेतीनशे माणसे मृत्युमुखी पडली, तरी त्यांना काही फरक पडला नाही. रशियाची आण्विक पाणबुडी बुडून शंभरहून अधिक लोग दगावले तेव्हाही पुतीन यांनी आंतरराष्ट्रीय मदत देखील नाकारली होती. तेलाच्या वाढत्या किंमतींच्या मदतीने आपल्या देशाची अर्थव्यवस्था सावरून धरल्यावर पुतीन यांनी विस्तारवाद सुरू केला. जॉर्जियाचे बंडखोर प्रांत बळकावले, क्रिमियावर ताबा मिळवला आणि दोन वर्षांपूर्वी त्यांनी युक्रेनवर वक्रनजर फिरवली. विशेष लष्करी कारवाईच्या नावाखाली आणि भाडोत्री सैनिकांच्या मदतीने त्यांनी सरळसरळ त्या देशाविरुद्ध युद्धच पुकारले आहे, परंतु व्लादिमीर झेलेन्स्की पुतीन यांना पुरून उरले आहेत आणि अमेरिकेच्या आणि नाटोच्या पाठबळाने अजूनही टिकाव धरून आहेत. पुतीन यांना हे सहन होणारे नाही हे उघड आहे. अमेरिकेच्या निवडणूक प्रणालीची नुकतीच त्यांनी खिल्ली उडवली. दहा डॉलरना तेथे मते विकली जातात असे ते म्हणाले व स्वतःच्या देशातील निवडणूक प्रणालीचा टेंभाही मिरवला. परंतु आपल्या विरोधकांनाच त्यांनी वेळोवेळी ज्या प्रकारे नामशेष करून टाकले आहे ते पाहता तेथे लोकशाही आहे कुठे असा प्रश्न पडतो. पुतीनच्या एकेका राजकीय विरोधकाचा केजीबी क्रूरपणे काटा काढते आहे. कोणाला पोलोनियम वापरून, कोणाला विष पाजून, कोणावर हल्ला चढवून एकेक पुतीन विरोधकाचा खात्मा चालला आहे. अलीकडेच मरण पावलेले अलेक्सी नवालूय हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे नुकतीच झालेली निवडणूक हा केवळ देखावा आहे. एका घातक हुकूमशहाचा रशियाच्या क्षितिजावर उदय झाला आहे. तो जेव्हा तिसऱ्या जागतिक महायुद्धाची भाषा करतो तेव्हा ती केवळ पोकळ धमकी निश्चितच म्हणता येत नाही.