शिक्षण व संस्कार

0
10

योगसाधना- 639, अंतरंगयोग- 225

  • डॉ. सीताकांत घाणेकर

बहुतेकजण भावाविना देवाकडे मागण्या करतात. म्हणून शास्त्रकार म्हणतात ः ‘मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव!’ अशा प्रार्थना फळत नाहीत. अवश्य याशिवाय सत्कर्मदेखील पदरी असायला हवे. म्हणून भक्तीबरोबर कर्मदेखील आवश्यक आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षण, संस्कार यांना अतिशय महत्त्व व हे अत्यंत आवश्यक घटकदेखील आहेत. योग्य शास्त्रशुद्ध शिक्षण व संस्कार मिळाले तर मानवाचे जीवन सुखी, आनंदी व समाधानी होईल. त्यामुळे भारतीय परंपरेत या दोन्हीना अग्रस्थान आहे.
शिक्षण व संस्कार देण्याचे विविध प्रकार आहेत- भाषणे, प्रवचने, कीर्तने, नाटके, सिनेमा, कथा… हे सगळेच मार्ग प्रभावी आहेत. पूर्वीच्या काळी कथा सोडून इतर सर्व गोष्टी घराबाहेर उपलब्ध होत असत. पण आता रेडिओ, टीव्ही, वॉट्सॲपमुळे सर्व गोष्टी घरबसल्या प्रत्येकाला मिळू शकतात.

आमच्या बालपणी आम्ही फक्त कथा घरबसल्या ऐकत होतो. थोडा विचार केला तर लक्षात येते की, त्यावेळी आमच्या घरी, शाळेत नियमित कथाकथन होत असे. वेगवेगळ्या कथा ः देवाच्या, संत-महापुरुषांच्या, भक्तांच्या, शूरवीरांच्या, राजा-महाराजांच्या… सगळ्याच बोधदायक व संस्कार करणाऱ्या. मुख्य म्हणजे या कथांतील पात्रे विविध होती- बालक, तरुण, वृद्ध, स्त्रिया, पुरुष… त्यामुळे प्रत्येकाबद्दल आदर वाटत असे, वाढत असे. दशावतारांच्या कथा तर अत्यंत लाभदायक वाटायच्या. महाकाव्ये- रामायण, महाभारत, भागवत तर अत्यंत प्रेरणादी वाटत असे.

अशा या कथांचा फायदा पुष्कळ होत असे. भाव, विश्वास, श्रद्धा वृद्धिंगत होत असत. अंगात वीरश्री संचारित असे. सेवा, त्याग या गुणांबद्दल आदर वाटत असे. दानाचे महत्त्व कळत असे. कर्मसिद्धांत समजला की जीवनाचे रहस्य समजत असे. या गोड कथा अजूनदेखील नजरेसमोर येतात. काही व्यक्ती या कथा अत्यंत भावपूर्ण रीतीने सांगत असत. त्या अजरामर झाल्या.
आतादेखील जीवनात काही समस्या, संकटे आली की लगेच कथेतील पात्रे आठवतात. मनाला उभारी येते. नकारात्मक विचार कमी होतात. तसेच सकारात्मक विचार वाढतात. समस्येला उत्तर व उपाय शोधणे सोपे होते. जीवन सुसह्य होते. प्रेरणा मिळते.
बालपणात काही कथांची फार मजा वाटायची. उदा. इसापनीती, पंचतंत्रातील कथा. या कथांमध्ये पशू, पक्षी, प्राणी एकमेकांशी बोलत. केव्हा केव्हा मनुष्यदेखील त्यांच्याशी वार्तालाप करताना आढळतो. फार कुतूहल वाटायचे. हे असे घडू शकते का? असे विचार मनात यायचे. तसेच त्यांची एकमेकांकडे बोलण्याची भाषा कुठली असेल? असे प्रश्न पडायचे.
बालपण सरले आणि तारुण्यात पदार्पण केले. थोडे ज्ञान आले तसे कळले की या कथा ज्ञानासाठी, सारांशासाठी, बोधासाठी असतात. त्यांची सत्यसत्यता पाहायची नसते. फक्त स्वतःसाठी धडा घ्यायचा असतो. आता प्रौढावस्थेतदेखील मीठ-मिरची-मसाला लावून कुणी कथा सांगितली तर बालपण आठवते. मनाला गुदगुल्या होतात. आनंद अनुभवाला येतो.
केव्हा केव्हा लहान मुलांना मी कथा ऐकवतो तेव्हा हावभाव करून सांगतो. त्यावेळी त्यांच्या मुखकमलावरील सुंदर बालभाव कौतुकास्पद असतात. काही मुलं तर संपूर्ण चित्त एकाग्र करून त्या कथांत रमतात.

अशीच एक कथा आठवते- एक दिवस म्हणे महर्षी नारद भूलोकांतून विष्णुलोकांत जात होते. वाटेत ते एका समुद्रापाशी पोचले. ऊन प्रखर होते. रेती तापली होती. एक पक्षी त्या रेतीत बसला होता. बघताक्षणीच वाटायचे की त्याला फार कष्ट होताहेत. नारदजींना त्याची दया आली. त्याच्याजवळ जाऊन ते पक्ष्याला म्हणाले- “बाबारे, तू ह्या समुद्रकिनारी एवढ्या उन्हात का राहतोस? इथून जवळच एक घनदाट जंगल आहे, तू तिथे जा. तुला भरपूर फळे, पाणी, छाया… सगळे मिळेल. इथे-तिथे भटकायची गरज नाही. सुखात राहशील!”
पक्षी हसतच म्हणाला, “नारदजी, तुम्ही सांगता हे खरे आहे. पण अनेक पिढ्या माझे कुटुंब येथेच राहिले. दुपारी उन्हाचा व रेतीचा अवश्य त्रास होतो, कारण इथे एकही झाड नाही. सकाळी, संध्याकाळी, रात्री येथे सर्व व्यवस्थित असते. या समुद्रावर लहानपणापासून माझे प्रेम आहे म्हणून मी माझ्या वैयक्तिक सुखासाठी ही जागा सोडू शकत नाही. तुम्हाला माझी दया येते तर तुमच्याकडे एक नम्र विनंती व प्रार्थना आहे. भगवान विष्णूला सांगा की माझ्यासाठी एक वृक्ष येथे तयार कर. मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही.”
नारदाने ही घटना भगवंताला सांगितली. विष्णू थोडावेळ डोळे बंद करून बसले. थोडे ध्यान केले व म्हणाले, “त्या पक्ष्याच्या नशिबात सावली नाही, मग झाड कुठून असणार? पण तुम्ही शिफारस करता म्हणून त्या पक्ष्याला एक संदेश द्या-

  1. दुपारी रेती तापलेली असते त्यावेळी त्याला एका पायावर उभा राहायला सांगा.
  2. ईश्वराचे सतत आभार मानायला सांगा.”
    नारदाने परत येताना त्या पक्ष्याला भगवंताचा निरोप दिला. पक्ष्याने महर्षींचे आभार मानले.
    काही काळ गेला. नारद पुन्हा एकदा त्याच समुद्रकिनाऱ्यावर आले, तर काय आश्चर्य! तिथे एक घनदाट वृक्ष आहे- फुलाफळांनी बहरलेला व तो पक्षी तिथे आनंदात राहत होता. महर्षींना आश्चर्य वाटले व भगवंताचा थोडा रागही आला. कारण त्यांनी त्याला खोटे सांगितले असे त्यांना वाटले.
    पक्ष्याने नारदाना नमस्कार करून त्यांचे आभार मानले. विष्णुलोकी गेल्यावर नारदांनी काहीशा रागातच भगवंताला सर्व घटना कथन केली व विचारले- “भगवान, आपण म्हणाला होता की त्या पक्ष्याच्या नशिबात सावली नाही, आणि आता तर तिथे मोठा वृक्ष आहे. आपणच तो त्याला दिला असेल!”
    भगवंत मिस्कील हास्य करीत म्हणाले, “नारदा, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. पण काहीवेळा मलासुद्धा सखोल विचार करून निर्णय घ्यावा लागतो. अनेक मुद्दे बघावे लागतात.
  3. त्या छोट्याशा पक्ष्याचे, आपल्या अनेक पिढ्यांचे तिथे असलेले वास्तव्य, त्यावरील प्रेम व ते स्थान सोडून न जाण्याचा निर्णय. वास्तविक जंगलात तो सुखाने राहिला असता. मानवाने यातून बोध घ्यायला हवा.
  4. मी सांगितलेल्या उपायांबद्दल विश्वास व माझ्यावर दृढ श्रद्धा व भाव. येथेदेखील मनुष्य कमी पडतो.
    तुला माहीत आहे की मी भावाचा भुकेला आहे. अशा परिस्थितीत माझ्या हृदयाला करुणेचा पाझर फुटतो. कुणाच्या भाग्यात नसले तरी मी त्याला आवश्यक ती गोष्ट देतो.

मी तुला खोटे सांगितले नव्हते. तुला सत्य सांगितले होते. पण तू गेल्यानंतर मी चिंतन केले. त्या पक्ष्याचा व तुझा भाव बघितला व त्याच्या भाग्यात नसलेला वृक्ष त्याला दिला.”
बालपणात ही कथा मला फार आवडायची. पक्षाचे, महर्षी नारदाचे, भगवान विष्णूचे कौतुक वाटायचे. पण त्या बालहृदयात एक उत्तम संस्कार झाला की हृदयात भाव व श्रद्धा ठेवून जर भगवंताचे स्मरण केले तर भाग्यात नसलेलेदेखील मिळते.
बहुतेकजण भावाविना देवाकडे मागण्या करतात. म्हणून शास्त्रकार म्हणतात ः ‘मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव!’ अशा प्रार्थना फळत नाहीत. अवश्य याशिवाय सत्कर्मदेखील पदरी असायला हवे. म्हणून भक्तीबरोबर कर्मदेखील आवश्यक आहे.
योगसाधकांना सर्व योगमार्गांचे- ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग (अष्टांगयोग) यांचे महत्त्व माहीत आहे. त्यांना या छोट्याशा कथेमधून बोध झालाच असेल.